
अमरावती, 15 ऑगस्ट (हिं.स.)
स्वातंत्र्य दिन तसेच अमरावती महानगरपालिकेच्या ४३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड येथे भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.रक्तदान शिबिराला खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय खोडके आणि आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी भेट देऊन रक्तदात्यांचे मनोबल वाढविले. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशसेवेची भावना आणि मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक दायित्वाचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला.यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी, मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, विरोधी पक्षनेता विलास इंगोले, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक-नगरसेविका तसेच मनपातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, सभागृह नेता चेतन गावंडे, झोन सभापती इस्माईल कासम लालुवाले, नगरसेवक अॅड. प्रशांत देशपांडे, सचिन वैद्य, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे यांच्यासह अनेकांनी रक्तदान केले.महापौर श्रीचंद तेजवानी यांनी रक्तदान हे एका गरजू व्यक्तीला जीवनदान देण्याचे महान कार्य असल्याचे सांगत भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांना मनपाकडून प्रोत्साहन दिले जाईल, असे स्पष्ट केले. खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी अपघातग्रस्त, प्रसूतीच्या वेळी महिलांना तसेच गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांना अचानक रक्ताची गरज भासू शकते. त्यामुळे रक्तदान हा देशसेवेचाच एक भाग असल्याचे सांगितले. आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी महिलांनी व युवकांनी रक्तदानाबाबत जनजागृती करून या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.रक्तदानासोबतच विशेष आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले. यामध्ये रक्त व लघवी तपासणी, हृदयरोग तपासणी, ईसीजी, अस्थिरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग व त्वचारोग तपासणी करण्यात आली. महिलांसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची पेपस्मिअर टेस्ट तसेच स्तन कर्करोगासाठी मॅमोग्राफीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.दरम्यान, बचत गटामार्फत तिरंगा राखी तयार करण्यात आली. तसेच देशभक्तीपर व अन्य गीतांच्या गायनाचा कार्यक्रमही पार पडला. रक्तदान करणाऱ्या नागरिकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण परिसरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचे वातावरण निर्माण झाले. वर्धापन दिन केवळ औपचारिक कार्यक्रमांपुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्याचा संदेश या शिबिरातून देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी