
चंद्रपूर, 15 ऑगस्ट (हिं.स.)।
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारने शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी महिला व पुरुष आणि तरुणांसाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या नेतृत्वात शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असल्यामुळे चंद्रपूर जिल्हा विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगीता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, सुधाकर अडबाले यांच्यासह जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, महानगरपालिका आयुक्त अकुनूरी नरेश यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती येाजनेचा निर्णय घेतला असून चंद्रपूर जिल्ह्यातील 23 हजार 508 शेतक-यांच्या कर्जखात्यात 175 कोटी प्राप्त झाले आहे. महिलांना शेतक-याचा दर्जा देण्याचे विधेयक शासनाने पावसाळी अधिवेशनात पारीत केले आहे. त्यामुळे आता महिलांना शेतकरी प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण 6 हजार 20 पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यात भुमी अभिलेख विभागातर्फे स्वामित्व योजनेंतर्गत आतापर्यंत एकूण 70 हजार 980 नागरिकांना सनद उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच 1 हजार 203 गावांचे मूळ गावठाणाचे ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण करून 2 लक्ष 12 हजार मिळकत पत्रिका तयार करण्यात आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव