
ग्रामसेवक, सरपंच गैरहजर; ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले कुलूप
अमरावती, १५ ऑगस्ट (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यातील पळसखेड येथे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी नियोजित ग्रामसभा न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेण्याची परंपरा असताना यंदा ग्रामसभा आयोजित करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र येत आक्रमक भूमिका घेतली.
ग्रामसभा होणार असल्याच्या अपेक्षेने अनेक ग्रामस्थ सकाळपासून ग्रामपंचायत कार्यालय परिसरात उपस्थित होते. मात्र, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यापैकी कोणीही उपस्थित न राहिल्याने नागरिकांचा संताप वाढला. अखेर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून निषेध नोंदविला. यावेळी कार्यालयातील टेबल-खुर्च्याही बाहेर काढण्यात आल्या.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्यात आलेली नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामसभेत गावातील विकासकामे, निधीचा वापर, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत नागरिकांना माहिती मिळणे अपेक्षित असते. मात्र, ग्रामसभा न झाल्याने नागरिकांना प्रश्न विचारण्याची आणि ग्रामपंचायतीच्या कारभाराचा हिशोब मागण्याची संधी मिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या कारभारात गैरप्रकार आणि भ्रष्टाचार झाल्याचे आरोपही ग्रामस्थांनी केले आहेत. या आरोपांबाबत ग्रामसेवकांनी ग्रामसभेत खुलासा करणे आवश्यक असताना ग्रामसभा घेतली जात नसल्याचा दावा नागरिकांनी केला. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामसभा न झाल्याच्या मुद्द्यावरून ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनामुळे पळसखेडमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये असलेला रोष या आंदोलनातून स्पष्ट झाला.
ग्रामसभा तातडीने घेऊन ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत तसेच ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची पारदर्शक माहिती द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आता प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन ग्रामसभा का घेण्यात आली नाही, याची चौकशी करून संबंधितांवर कोणती कारवाई करते, याकडे पळसखेड ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी