
अमरावती, 15 ऑगस्ट (हिं.स.)।
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत भवनाच्या बांधकामावरून वाद निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत भवनासाठी मंजूर झालेल्या जागेवरच इस्टिमेटप्रमाणे बांधकाम करण्यात यावे, तसेच जागेवरील अतिक्रमण तातडीने हटवावे, या मागणीसाठी शिवसेना तालुकाप्रमुख तथा ग्रामपंचायत उपसरपंच प्रमोद कोहळे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
उपसरपंच कोहळे यांच्या म्हणण्यानुसार, मंजूर जागेवर ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम सुरू असताना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दबावामुळे जागा बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे मंजूर आराखड्यानुसार सुरू असलेले काम अडचणीत येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ग्रामपंचायत भवनाच्या बांधकामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, ग्रामपंचायतीच्या जागेवरील अतिक्रमण तातडीने हटवावे आणि मंजूर जागेवरच बांधकाम सुरळीत करावे, अशा विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा कोहळे यांनी प्रशासनाला दिला आहे.
--------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी