
नाशिक, 15 ऑगस्ट (हिं.स.)।
:- कुंभमेळ्यासाठी रस्त्याच्या कामाचे ३०० कोटी रुपयांचे टेंडर मिळवून देतो, असे आमिष दाखवून जामनेर (जि. जळगाव) येथील तिघा जणांनी मालेगावच्या इसमाची ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सुरेश महेंद्र पवार (रा. सोयगाव, ता. मालेगाव) हे व्यापारी आहेत. आरोपी शकील अहमद सलिमोद्दीन शेख, तनय महाजन व नरेंद्र महाजन (सर्व रा. जामनेर, जि. जळगाव) यांनी संगनमत करून फिर्यादीला कुंभमेळ्यासाठी रस्त्याच्या कामाचे ३०० कोटी रुपयांचे वेगवेगळे तीन टेंडर मिळवून देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर भारत सरकारची राजमुद्रा असलेले व त्यावर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांची डिजिटल साईन असलेली नाशिक मनपाची बनावट वर्कऑर्डर तयार करून ती फिर्यादीला दाखविली. त्यानंतर वेळोवेळी टेंडर मिळवून देण्यासाठी ५० लाख रुपये रोख स्वरूपात तनय महाजन, शकील अहमद आणि नरेंद्र महाजन यांनी घेतले. त्यानंतर आरोपींच्या काम करण्याच्या पद्धतीवर संशय आल्याने फिर्यादीला आपली फसवणूक होत असल्याची बाब आढळून आली. त्यानंतर फिर्यादीने तीनही आरोपींकडे पैसे परत करण्याची मागणी केली असता त्यांनी फिर्यादीच्या सांगण्यानुसार त्यांचा अकाऊंटंट कुणाल मीठभाकरे याच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये परत देऊन उर्वरित ३५ लाख रुपये परत न करता फिर्यादीच्या रकमेचा अपहार करून त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काकडे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI