
रोख रक्कम, पिकअपसह चार दुचाकी असा १४.६९ लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर, 15 ऑगस्ट (हिं.स.)।लातूर शहरातील बीएसएनएल केबल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत १० संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईत चोरीच्या केबल विक्रीतून मिळालेली २ लाख १९ हजार रुपयांची रोख रक्कम, गुन्ह्यात वापरण्यात आलेली पिकअप आणि चार मोटारसायकली असा एकूण १४ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पथक मालमत्तेविषयक गुन्ह्यांचा समांतर तपास करत होते. १४ ऑगस्ट रोजी रात्री विवेकानंद चौक ते गंजगोलाई मार्गावरील यशवंत शाळेसमोरील वेअरहाऊस परिसरात पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनाजवळ काही व्यक्ती संशयास्पदरीत्या थांबल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पथकाने रात्री सुमारे दहा वाजता परिसरात सापळा रचून पिकअप व चार दुचाकींसह १० जणांना ताब्यात घेतले.
संशयितांची अंगझडती घेतली असता रामा व्यंकटी शिंदे आणि अनिल शामराव पवार यांच्याकडे २ लाख १९ हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली. या रकमेबाबत आणि वाहनांबाबत पोलिसांनी कसून चौकशी केली असता काही दिवसांपूर्वी यशवंत शाळा परिसरातून बीएसएनएलची केबल चोरी करून ती पिकअपमधून नेल्याची माहिती समोर आली.चोरी केलेली केबल विक्री करून त्यातून मिळालेली रक्कम आपल्याकडे असल्याचेही चौकशीत निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच पुन्हा केबल चोरी करण्याच्या उद्देशाने हे सर्वजण त्या परिसरात थांबले असल्याची माहिती तपासात समोर आली.
१० संशयित ताब्यात
या कारवाईत रामा व्यंकटी शिंदे (वय ५२), अनिल शामराव पवार (४०), अंकुश मनोहर शिंदे (२९), शंकर प्रकाश शिंदे (२५), विजय मारोजी शिंदे (४५), लक्ष्मण बापू शिंदे (४५), प्रकाश सावळा शिंदे (३६), सुनिल रमेश शिंदे (२४), शिवा पांडुरंग पवार (२१) आणि सुनिल रामा शिंदे (२२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्व हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
१४.६९ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी या कारवाईत २ लाख १९ हजार रुपये रोख, महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची पिकअप आणि विविध कंपन्यांच्या चार मोटारसायकली असा एकूण १४ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेले संशयित आणि जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis