अहमदपूर नगर परिषदेच्या अपूर्ण नवीन इमारतीतील लिफ्टच्या खड्ड्यात आढळला तरुणाचा मृतदेह
लातूर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। अहमदपूर शहरातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे. अहमदपूर नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम काही काळापासून रखडले असून, याच अपूर्ण व असुरक्षित इमारतीमधील लिफ्टसाठी केलेल्या खड्ड्यात एका ३२ वर्षीय तरुणाचा मृ
तरुणाचा मृत्यू


लातूर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। अहमदपूर शहरातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे. अहमदपूर नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम काही काळापासून रखडले असून, याच अपूर्ण व असुरक्षित इमारतीमधील लिफ्टसाठी केलेल्या खड्ड्यात एका ३२ वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

मयत झालेल्या तरुणाची ओळख महबूब बागवान (वय अंदाजे ३२ वर्षे, रा. अहमदपूर) अशी पटली आहे. घटनेची माहिती मिळताच अहमदपूर पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि फॉरेन्सिक (तज्ज्ञ) टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नगर परिषदेच्या या नवीन इमारतीचे बांधकाम रखडल्यामुळे येथे सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही ठोस उपाय किंवा बॅरिकेट्स लावण्यात आले नव्हते. त्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली असावी, अशी प्राथमिक चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. महबूब बागवान यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने आणि कसा झाला? हा घातपात आहे की अपघाती मृत्यू? याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता आलेली नाही. पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

दरम्यान, शासकीय व निमशासकीय इमारतींच्या रखडलेल्या बांधकामांच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना असणे बंधनकारक असतानाही प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. याप्रकरणी संबंधित प्रशासनाने व ठेकेदाराने या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती लवकरात लवकर स्पष्ट करावी आणि दोषींवर योग्य ती कठोर कारवाई करावी, अशी तीव्र मागणी संतप्त नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande