जलसंधारणावर भर देणार; शेतकऱ्यांना ३०८ कोटींची मदत- दादाजी भुसे
अमरावती, १५ ऑगस्ट (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत ३०८ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने आगामी काळात जलसंधारणाच्या विविध उपायय
स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा जलसंधारण, शेतकऱ्यांच्या मदतीवर भर - दादाजी भुसे


अमरावती, १५ ऑगस्ट (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत ३०८ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने आगामी काळात जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांवर विशेष भर देण्यात येणार असून, शेतकऱ्यांना मदत देण्याचे कामही सुरूच राहील, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

स्वातंत्र्यदिनाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त नयना गुंडे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त राकेश ओला, जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जलसंधारण अभियान राबविणार

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी 'जलसंधारण अभियान' राबविण्यात येणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी 'जलसंधारण दिन' साजरा करण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे काही भागांत झालेल्या नुकसानीसाठीही मदत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी आर्थिक अडचणी येऊ नयेत, यासाठी पीक कर्जाचे वाटप करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

३० हजार शिक्षकांची भरती

शिक्षण क्षेत्रात मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रप्रमुख पदांची भरती करण्यात आली असून, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू असल्याची माहिती भुसे यांनी दिली. शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत अनिवार्य करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

२६ जानेवारी रोजी दोन कोटी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सामूहिक कवायतीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

चिखलदरा पर्यटन आणि विमानतळ विकासाला चालना

जिल्ह्यातील पायाभूत सुविधा आणि ग्रामविकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेषतः पांदण रस्त्यांसाठी निधी देण्यात आला असून, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी वाहतुकीचे मार्ग उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

चिखलदरा पर्यटनस्थळाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत असून, येथील स्कायवॉकचे कामही वेगाने पूर्ण करण्यात येत असल्याचे भुसे यांनी सांगितले. अमरावती विमानतळ विस्तारीकरण, नाईट लँडिंग सुविधा आणि पायलट प्रशिक्षण केंद्र उभारणीची कामेही वेगाने सुरू आहेत. वस्त्रोद्योगाच्या विकासासाठीही प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गुणवंतांचा सत्कार; विविध उपक्रमांची शपथ

कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविल्याबद्दल सारांश सारडा, गार्गी कुऱ्हाडे आणि दिया पाटील यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी जलसंधारण, व्यसनमुक्ती, पॉश कायदा आणि साक्षरतेची शपथ घेण्यात आली. तसेच जलसंधारणाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला प्रशासनातील विविध अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande