
मैत्रिणीला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसरीचाही दुर्दैवी अंत
यवतमाळ, १५ ऑगस्ट (हिं.स.)। पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी बोरगाव धरणावर गेलेल्या दोन तरुण विद्यार्थिनींचा जलाशयात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पाण्यात घसरलेल्या मैत्रिणीला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या विद्यार्थिनीलाही जीव गमवावा लागला. या घटनेमुळे यवतमाळमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अमृता अशोक खेडकर (२०, रा. महात्मा फुले कॉलेजसमोर, धामणगाव रोड) आणि मोहिनी गौत्रे (२०, रा. भोसा रोड) अशी मृत विद्यार्थिनींची नावे आहेत. दोघीही यवतमाळ येथील वाधवानी फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या.
अमृता आणि मोहिनी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आपल्या काही वर्गमित्रांसोबत यवतमाळनजीकच्या बोरगाव धरण परिसरात फिरण्यासाठी गेल्या होत्या. पावसाळ्यामुळे परिसरात पसरलेली हिरवळ आणि धरणातील वाढलेला जलसाठा यामुळे हा परिसर पर्यटकांचे आकर्षण ठरतो. मित्र-मैत्रिणी निसर्गाचा आनंद घेत असताना अमृता आणि मोहिनी धरणाच्या काठावर पाण्याजवळ गेल्या.
यावेळी निसरड्या काठाचा अंदाज न आल्याने अमृताचा अचानक पाय घसरला आणि ती खोल पाण्यात पडली. मैत्रीण पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच मोहिनीने तिला वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह, चिखल आणि झालेल्या ओढाताणीमुळे मोहिनीचाही तोल गेला. काही क्षणांतच दोघीही खोल पाण्यात बुडाल्या.
त्यांच्यासोबत असलेल्या एका युवकाने प्रसंगावधान राखत तातडीने पाण्यात उडी घेतली आणि दोघींना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याची खोली आणि परिस्थिती प्रतिकूल असल्याने त्याचे प्रयत्न अपुरे ठरले. अखेर स्वतःचा जीव वाचवत त्याला काठावर परतावे लागले.
घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलिस आणि स्थानिक बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गोताखोरांच्या मदतीने शोधमोहीम राबवून दोन्ही विद्यार्थिनींचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच दोन्ही कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्या तरुण मुलींचे निष्प्राण देह पाहून पालकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
पर्यटनाचा अतिउत्साह जीवावर बेतू शकतो
पावसाळ्यात धरणे, तलाव, नद्या आणि धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. पाण्याची खोली किंवा प्रवाहाचा अंदाज न घेता पाण्यात उतरणे तसेच निसरड्या आणि धोकादायक काठांवर जाणे जीवघेणे ठरू शकते. एका क्षणाची असावधता दोन कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. त्यामुळे जलाशयांच्या परिसरात पर्यटकांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी