
लातूर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवणे आणि पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रदीर्घ काळ निष्कलंक, उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवा बजावणाऱ्या २१ पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस महासंचालक यांच्या वतीने जाहीर झालेली अति उत्कृष्ट सेवा पदक, उत्कृष्ट सेवा पदक व विशेष सेवा पदके प्रदान करण्यात आली. त्यानिमित्त स्वातंत्र्य दिनी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाताई पाटील, लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्रीताई सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल शरद पांढरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
लातूर जिल्हा पोलीस दलात ३० ते ३९ वर्षांपर्यंतची प्रदीर्घ सेवा बजावणाऱ्या अधिकारी व अंमलदारांना अति उत्कृष्ट सेवा पदकाने गौरवण्यात आले. यामध्ये उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे, बी.डी.डी.एस. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार इब्राहिम शेख, पोलीस उपनिरीक्षक अरुण रुक्माजी डोंगरे, वाचक शाखा येथील परमेश्वर बाबुराव अंभोरे आणि औसा पोलीस ठाणे येथील मोहन श्रीपती धुमाळ यांचा समावेश आहे.
तसेच १७ ते ३३ वर्षांपर्यंतच्या उल्लेखनीय व उत्कृष्ट सेवेबद्दल १३ अधिकारी व अंमलदारांना उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले. यामध्ये औसा उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार भिकाजी चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर मुरलीधर बावकर, आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक सौदागर माने, मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामदास बलभीम नाडे, पोलीस अधीक्षक कार्यालयातील लघुलेखक शाखेचे प्रवीण जीवनराव मोटेगांवकर, स्थानिक गुन्हे शाखेचे दत्तात्रय माधव शिंदे, विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे बालाजी पंढरीनाथ जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे मोहन गोराव सुरवसे, वाचक शाखेचे नानासाहेब आनंद भोंग, स्थानिक गुन्हे शाखेचे माधव लक्ष्मण बिलपाटे, स्थानिक गुन्हे शाखेचे राजेश विठ्ठलराव कंचे, वाचक शाखेचे परमेश्वर जनक देकणे, वाचक शाखेचे प्रकाश नामदेवराव जाधव आणि वाचक शाखेचे अभिजीतसिंह नंदकिशोरसिंह चव्हाण यांचा समावेश आहे.
यासोबतच गडचिरोलीसारख्या अत्यंत नक्षलग्रस्त व खडतर भागात प्रामाणिक व धैर्याने विशेष सेवा बजावल्याबद्दल एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजय माधवराव पाटील आणि देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अक्षय माधवराव पाटील या दोन अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis