
अमरावती, 15 ऑगस्ट (हिं.स.)
१ मिनिट १६ सेकंद श्वास रोखून तिरंग्याला दिली मानवंदना
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात तिरंग्याप्रती आदर आणि देशभक्तीची भावना व्यक्त केली जात असताना अमरावतीतील पोलीस शिपायाने देशभक्तीचा अनोखा आविष्कार साकारला. पोलीस अंमलदार प्रवीण दादाराव आखरे यांनी सुमारे १० फूट पाण्याखाली उतरून तिरंग्याला मानवंदना दिली. विशेष म्हणजे त्यांनी पाण्याखाली तब्बल २५ मीटर सायकल चालवत १ मिनिट १६ सेकंद श्वास रोखून हा अनोखा उपक्रम पूर्ण केला.केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या अनुषंगाने १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त अमरावती शहरातील पोलीस जलतरण केंद्रात हे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तिरंगा ध्वजासह पाण्याखाली सायकल चालवून त्यांनी राष्ट्रध्वजाला अभिवादन केले. या उपक्रमादरम्यान त्यांनी कृत्रिम ऑक्सिजन किंवा श्वसनासाठी कोणत्याही उपकरणाचा वापर केला नाही.
.अमरावती येथील जोग स्टेडियम परिसरातील पोलीस विभागाच्या जलतरण तलावात प्रवीण आखरे यांनी हे प्रात्यक्षिक सादर केले. त्यासाठी विशेष पद्धतीने तयार केलेल्या सायकलचा वापर करण्यात आला. सायकलवर तिरंगा ध्वज लावण्यात आला होता. तिरंगा सोबत घेऊनच त्यांनी पाण्याच्या तळाशी सायकल चालवत राष्ट्रध्वजाप्रती आदर व्यक्त केला.पाण्याखाली सायकल चालवणे हे जमिनीवर सायकल चालवण्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आणि आव्हानात्मक आहे. सायकल पाण्यावर तरंगण्याची शक्यता असल्याने ती पाण्याच्या तळाशी स्थिर ठेवणे हे मोठे आव्हान होते. हे आव्हान लक्षात घेऊन सायकलमध्ये विशेष तांत्रिक बदल करण्यात आले.
विशेष सायकल तयार करण्यात प्रवीण आखरे यांचे मित्र तसेच सायकल मेकॅनिक महेंद्र जडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सायकलच्या फ्रेममध्ये अशा प्रकारे बदल करण्यात आले की, त्यामध्ये पाणी प्रवेश करू शकेल. त्यामुळे सायकलचे वजन वाढून ती पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगण्याऐवजी तळाशी राहण्यास मदत झाली.सायकलच्या पुढील बाजूस ट्यूबलेस टायर बसवण्यात आला, तर मागील बाजूस वेगळ्या प्रकारचा टायर वापरण्यात आला. सायकलचा समतोल राखण्यासाठी मागील बाजूस तसेच दोन्ही बाजूंना लहान मुलांच्या सायकलींना लावण्यात येणाऱ्या अतिरिक्त चाकांसारखी सपोर्ट व्यवस्था करण्यात आली. या बदलांमुळे पाण्याखाली सायकल नियंत्रित करणे शक्य झाले.
सुमारे १० फूट खोल पाण्यात उतरून प्रवीण आखरे यांनी श्वास रोखला आणि तिरंगा घेऊन सायकल चालवण्यास सुरुवात केली. त्यांनी २५ मीटर अंतर यशस्वीपणे पार केले. या संपूर्ण उपक्रमादरम्यान त्यांनी तब्बल १ मिनिट १६ सेकंद श्वास रोखून ठेवला.पाण्याखाली सायकलचा समतोल राखण्यासोबतच तिरंगा योग्य स्थितीत ठेवणे हेही त्यांच्यासाठी आव्हान होते. मात्र, सातत्यपूर्ण सराव, शारीरिक तंदुरुस्ती आणि पाण्यातील कौशल्याच्या जोरावर त्यांनी हे प्रात्यक्षिक यशस्वी करून दाखवले.
प्रवीण आखरे यांना पाण्याखाली विविध योगासने करण्याचा अनुभव आहे. दीर्घकाळ श्वास रोखून ठेवण्याच्या सरावामुळे आणि पाण्याखालील कौशल्यामुळे त्यांनी यापूर्वीही विविध उपक्रम साकारले आहेत. त्यांच्या या कौशल्याची दखल घेत त्यांना यापूर्वी पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.याच अनुभवाच्या आधारे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने तिरंग्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने मानवंदना देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तिरंग्याप्रती आदर व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते. देशप्रेमाची भावना कृतीतून व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम केल्याचे प्रवीण आखरे यांनी सांगितले.
डीसीपी प्रांजली सोनवणे यांच्याकडून कौतुक
अमरावती पोलीस विभागाच्या डीसीपी प्रांजलि सोनवणे यांनी प्रवीण आखरे यांच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले. पाण्याखाली सायकल चालवणे हेच मोठे आव्हान असून, त्यात कोणत्याही ऑक्सिजन सिलिंडरचा वापर न करता श्वास रोखून हा उपक्रम पूर्ण करणे निश्चितच कौशल्याचे काम असल्याचे त्यांनी नमूद केले.प्रवीण आखरे यांनी सातत्यपूर्ण सराव, योगाभ्यास आणि विशेष कौशल्याच्या माध्यमातून हे शक्य करून दाखवले असून, त्यांच्या कामगिरीचा अमरावती पोलीस दलाला अभिमान असल्याचेही डीसीपी सोनवणे यांनी सांगितले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने तिरंग्याप्रती आदर आणि देशभक्तीची भावना अशा अनोख्या पद्धतीने व्यक्त करणे निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
आज स्वातंत्र्यदिनी झाला विशेष सत्कार
दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पोलीस शिपाई प्रवीण आखरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना मेडल, शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.तिरंग्याला अनोख्या पद्धतीने मानवंदना देत देशभक्तीची भावना व्यक्त करणाऱ्या त्यांच्या या उपक्रमाची दखल घेत हा सन्मान केला गेला आहे.वर्दीसोबत देशभक्तीचा अनोखा अंदाज एक तिरंगा, एक सलामी आणि मानवंदनेची पद्धत मात्र अनोखी. सुमारे १० फूट पाण्याखाली २५ मीटर सायकल चालवत आणि १ मिनिट १६ सेकंद श्वास रोखून प्रवीण आखरे यांनी राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली.त्यांचा हा उपक्रम केवळ पाण्याखाली सायकल चालविण्याचे कौशल्य नसून, वर्दीसोबत असलेली देशभक्ती, सातत्यपूर्ण मेहनत आणि तिरंग्याप्रती असलेला आदर यांची अनोखी अभिव्यक्ती ठरली आहे. अमरावती पोलीस दलातील या अनोख्या उपक्रमाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले असून, नव्या पिढीला राष्ट्रप्रेम आणि तिरंग्याचा सन्मान करण्याचा प्रेरणादायी संदेश दिला आहे.
-------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी