
कोल्हापूर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। शिरोली पुलाची ता. हातकणंगले येथील 'श्री शाहू तरुण मंडळा'च्या वतीने १५ ऑगस्ट या भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून यावर्षी एक अत्यंत स्तुत्य आणि सामाजिक समतेचा संदेश देणारा उपक्रम राबवण्यात आला. तो म्हणजे मंडळाचा तिरंगा ध्वज ग्रामपंचायत सफाई कर्मचाऱ्यां च्या हस्ते फडकवण्यात आला.
प्रतिवर्षाप्रमाणे केवळ औपचारिकता न पाळता, श्री शाहू तरुण मंडळाने यावर्षी समाजातील सर्वात महत्त्वाच्या पण अनेकदा उपेक्षित राहणाऱ्या घटकाला मुख्य प्रवाहात आणून त्यांचा गौरव केला. परिसराची अहोरात्र स्वच्छता राखून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणाऱ्या स्थानिक सफाई कामगारांना या दिमाखदार सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. सकाळी ठीक ९:०० वाजता मंडळाच्या प्रांगणात राष्ट्रभक्तीच्या सुरावलींनी वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण केला होता. परिसरातील नागरिक, अबालवृद्ध आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे सन्माननीय सफाई कामगारांच्या हस्ते झालेला ध्वजारोहण सोहळा. जेव्हा या स्वच्छतादूतांनी आपल्या हातांनी तिरंग्याची दोरी ओढली आणि हवेत आमचा राष्ट्रीय ध्वज मानाने फडकला, तेव्हा संपूर्ण परिसर भारत माता की जय आणि वंदे मातरम च्या घोषणांनी दुमदुमून गेला. ध्वजारोहणानंतर मंडळाच्या वतीने सर्व सफाई कामगारांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. समाजासाठी त्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. व्हीआयपी संस्कृतीला फाटा देत खऱ्या अर्थाने देशाची सेवा करणाऱ्या हातांना हा सर्वोच्च मान दिल्याबद्दल उपस्थितांच्या डोळ्यात अभिमान आणि चेहऱ्यावर आदराचा भाव दिसून येत होता. श्री शाहू तरुण मंडळाने या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक समता आणि श्रमप्रतिष्ठेचा एक नवा आणि आदर्श वस्तुपाठ समाजासमोर घालून दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar