पथ्रोटमधील दीड कोटींचे कचरा व्यवस्थापन प्रकल्प रखडले
प्लॅस्टिक कचरा प्रकल्पाची इमारत वीजपुरवठ्याअभावी बंद सांडपाणी-घनकचरा प्रकल्प जागेअभावी कागदावरच अमरावती, १५ ऑगस्ट (हिं.स.)। स्वच्छ भारत अभियानांतर्गत पथ्रोट ग्रामपंचायतीसाठी मंजूर झालेल्या सुमारे दीड कोटी रुपयांच्या सांडपाणी, घनकचरा आणि प्लॅस्टि
पथ्रोटचे दोन प्रकल्प रखडले


प्लॅस्टिक कचरा प्रकल्पाची इमारत वीजपुरवठ्याअभावी बंद

सांडपाणी-घनकचरा प्रकल्प जागेअभावी कागदावरच

अमरावती, १५ ऑगस्ट (हिं.स.)। स्वच्छ भारत अभियानांतर्गत पथ्रोट ग्रामपंचायतीसाठी मंजूर झालेल्या सुमारे दीड कोटी रुपयांच्या सांडपाणी, घनकचरा आणि प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनाच्या दोन प्रकल्पांना प्रशासकीय दिरंगाईचा फटका बसला आहे. प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाची इमारत पूर्ण होऊनही वीजपुरवठ्याअभावी ती वापराविना उभी आहे, तर सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जागा निश्चितीचा प्रश्न कायम असल्याने हा प्रकल्प अद्याप कागदावरच असल्याचे चित्र आहे.

पथ्रोट ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक चारमध्ये महामार्गालगत असलेल्या एका लेआउटच्या खुल्या भूखंडावर प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाची इमारत उभारण्यात आली आहे. सुमारे १६ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामध्ये अचलपूर तालुक्यातील विविध भागांतून जमा होणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे. टाकाऊ प्लॅस्टिकपासून टिकाऊ वस्तू तयार करण्यासोबतच स्थानिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश या प्रकल्पामागे आहे.

मात्र, इमारत पूर्ण होऊन बराच कालावधी उलटूनही प्रत्यक्ष प्रकल्प सुरू झालेला नाही. वीजपुरवठ्याअभावी लाखो रुपयांची ही इमारत सध्या वापराविना पडून असल्याने शासनाच्या निधीचा अपेक्षित उपयोग होत नसल्याची नाराजी ग्रामस्थांमध्ये आहे.

सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर

पथ्रोट आणि रामापूर गावांच्या मधून थापीरा जंगलातून उगम पावलेला नाला वाहतो. दोन्ही गावांतील जवळपास ८० टक्के सांडपाणी विविध ठिकाणच्या गटारांद्वारे या नाल्यात सोडले जाते. पावसाळ्यात गावाच्या वरील भागातून नाल्यात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढल्यास परिसरातील रस्त्यांवर पाणी साचून काही काळ वाहतुकीवरही परिणाम होतो.

गुजरी लाइनजवळील मोठ्या पक्क्या नालीतून हे सांडपाणी नाल्यात जाते. त्यानंतर महामार्गावरील पुलाखालून वाहत हे पाणी भुलेश्वरी नदीला मिळते. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, जागा निश्चितीचा प्रश्न अद्याप सुटलेला नसल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.

वर्षभरापूर्वी दिली होती प्रकल्पाची माहिती

८ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी पथ्रोट ग्रामपंचायतीला भेट देऊन या प्रकल्पाची माहिती दिली होती. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत १५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांच्या यादीत पथ्रोटचा समावेश असल्याने येथे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.

कोट्यवधी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पांचा उद्देश प्रत्यक्षात साध्य होण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, वीजपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावावा आणि सांडपाणी-घनकचरा प्रकल्पासाठी जागा निश्चित करून काम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande