
छत्रपती संभाजीनगर, 15 ऑगस्ट (हिं.स.)।
श्रावण सोमवारी घृष्णेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेरूळ येथील १२ वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील गर्दी लक्षात घेता प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी व्हीआयपी दर्शन तसेच गाभाऱ्यातील अभिषेक-महापूजा बंद ठेवण्यात येणार आहे. सामान्य भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, हा यामागील उद्देश आहे. स्थानिक भाविकांसाठी पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत आधारकार्ड दाखवून विशेष दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. वशिल्याने दर्शन दिले जाणार नसून रांगेतील भाविकांनाच प्रवेश मिळणार आहे. मंदिर परिसरात २४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच एसटी व शहर बसची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली असून शनिवार, रविवार आणि सोमवारी वैद्यकीय पथक तैनात राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis