
अमरावती, 24 ऑगस्ट (हिं.स.) अमरावती जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात सोमवारी पहाटे साडेतीन वाजता नवजात शिशु अतिदक्षता विभागाला भीषण आग लागली. या आगीत एकूण तीन नवजात बाळ भाजून दगावल्याची दुर्दैवी घटना घडली.पहाटे साडेतीनला लागली आग - जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे साडेतीन वाजता भीषण आग लागली. यावेळी नवजात शिशू अतिदक्षता विभागात कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही आग इतकी भीषण होती की अवघ्या काही वेळात रौद्ररूप धारण केलं.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात धाव घेतली. या घटनेवेळी नवजात शिशु अतिदक्षता विभागात एकूण नऊ बालक दाखल होतो. या भीषण घटनेत तीन बालक भाजून दगावले, तर सहा बाळांना कर्मचाऱ्यांनी अतिदक्षता विभागातून बाहेर काढलं. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी पहाटे साडेतीन वाजता नवजात शिशु अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाला. त्यामुळे लागलेली आग अतिदक्षता विभागात वेगाने पसरली. मात्र, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या कक्षातील बालकांना वेगाने बाहेर काढले.
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर एकूण तीन नवजात शिशु अतिदक्षता कक्ष आहेत. या तीन कक्षांमध्ये प्रत्येकी 13 अशी मिळून 39 नवजात बालकांवर उपचार घेण्याची क्षमता आहे. यापैकी एका कक्षात आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच ड्युटीवर असलेल्या डॉक्टर आणि नर्सेस, कर्मचाऱ्यांनी या कक्षातील लहान बाळांना बाहेर काढले. मात्र, यात तीन बालकांचा मृत्यू झाला.
------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी