
अकोला, 25 ऑगस्ट (हिं.स.) : अकोला इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात कायमस्वरूपी सहाय्यक कामगार आयुक्ताची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनने केली आहे.
प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त आठवड्यातून केवळ एक दिवस कार्यालयात उपस्थित राहत असल्याने बांधकाम कामगारांना नोंदणी, नूतनीकरण तसेच विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. कार्यालयीन कामकाजासाठी कामगारांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचे आर्थिक नुकसान होत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.
शिष्यवृत्ती, प्रसूती लाभ, अंत्यविधी लाभ, मुलीच्या विवाहासाठीचा लाभ, गृहपयोगी संच आणि सुरक्षा संच यांसारख्या योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी दूर करून प्रक्रिया सुलभ करण्याची मागणीही संघटनेने केली आहे. ऑनलाइन प्रक्रियेमुळे लांब तारखा मिळणे तसेच जाचक कागदपत्रांची मागणी यामुळे कामगारांना त्रास सहन करावा लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
कामगारांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी कार्यालयीन कामकाजाचे योग्य नियोजन, प्रभावी मार्गदर्शन आणि कल्याणकारी योजनांची गतिमान अंमलबजावणी आवश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. त्यामुळे अकोला जिल्हा कार्यालयात कायमस्वरूपी सहाय्यक कामगार आयुक्ताची नियुक्ती करून बांधकाम कामगारांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
ही मागणी जिल्हाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सचिव पंचशील गजघाटे, महिला जिल्हाध्यक्ष अनुराधाताई ढिसाळे, भास्कर सोनवणे, प्रकाश तेलगोटे, निशिकांत सरदार, अनिल येलकर, सचिन तायडे, अजिंक्य सूर्यवंशी, सुनील तायडे, संदीप नरवणे, विशाल घायवट, उद्धव ढिसाळे, कुणाल नागदिवे आणि प्रशिक गुळदे यांनी केली आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे