अमरावतीच्या गणेश चौकात गुंजला ‘बदलाव जरूरी है’चा नारा
अमरावती, 26 ऑगस्ट (हिं.स.)। ‘बदलाव जरूरी है..चलो दिल्ली!’ या घोषणांनी नेरपिंगळाई येथील गणेश चौक परिसर दुमदुमून गेला. एक सप्टेंबरच्या ‘चलो दिल्ली’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्ष शाखा नेरपिंगळाईच्या वतीने जनजागरण सभेचे आयोजन करण्यात
गणेश चौकात गुंजला ‘बदलाव जरूरी है’चा नारा


अमरावती, 26 ऑगस्ट (हिं.स.)। ‘बदलाव जरूरी है..चलो दिल्ली!’ या घोषणांनी नेरपिंगळाई येथील गणेश चौक परिसर दुमदुमून गेला. एक सप्टेंबरच्या ‘चलो दिल्ली’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्ष शाखा नेरपिंगळाईच्या वतीने जनजागरण सभेचे आयोजन करण्यात आले होते. क्रांतिकारी कलापथकाच्या माध्यमातून सादर झालेल्या कार्यक्रमामुळे सभेला विशेष रंगत आली. शाहीर धम्मा खडसे यांच्या क्रांतिकारी गायनाने उपस्थित भारावून गेले.

देशातील अराजकता, वाढती महागाई, बेरोजगारी, विद्यार्थी व तरुणांवरील अन्याय, महिला सुरक्षितता, जातीयवाद आणि भ्रष्टाचार, यासारख्या प्रश्नांचा त्यांनी गीतांच्या माध्यमातून परखड समाचार घेतला. अन्यायाविरोधात संघर्ष करण्याचे आवाहनही करण्यात आले. प्रा. डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे यांनी शेती व शेतीच्या अर्थकारणाचा आढावा घेतला. वाढता उत्पादन खर्च, शेतीमालाच्या भावातील अनिश्चितता, बाजारपेठेतील अडचणी, कर्जबाजारीपणा आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी सुनील मेटकर यांनी कष्टकरी जनतेच्या प्रश्नांसाठी पक्षाने केलेल्या संघर्षाची माहिती देत सर्वसामान्य जनतेने या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच एक सप्टेंबरच्या ‘चलो दिल्ली’ अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. भारतीय कम्युनिस्ट पक्ष शाखा नेरपिंगळाईच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. समविचारी पक्ष व मित्रपक्षांच्या सहकार्यामुळे जनजागरण सभेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. क्रांतिकारी गीतांचा जोश, वक्त्यांचे विचार आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande