
अकोला, 25 ऑगस्ट (हिं.स.)। अकोला शहराच्या ऐतिहासिक स्मृतींशी जोडलेल्या फतेह चौकाने एका नव्या पर्वाची अनुभूती घेतली. फतेह चौक कमानीचे बांधकाम आणि सौंदर्यीकरण पूर्ण झाल्यानंतर झालेल्या भव्य लोकार्पण सोहळ्याने संपूर्ण परिसर उत्साहाने भारून गेला. रात्री ८ वाजता झालेल्या या सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्या रूपातील फतेह चौकाचे जल्लोषात स्वागत केले.
अकोला पश्चिमचे आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष साजिद खान पठाण यांच्या हस्ते या कमानीचे लोकार्पण करण्यात आले. पारंपरिक वारसा आणि आधुनिक सौंदर्यदृष्टी यांचा सुरेख मेळ साधत उभारण्यात आलेली कमान आता फतेह चौकाच्या आकर्षणात भर घालणारी ठरत आहे.फतेह चौक परिसराला ऐतिहासिक तसेच सामाजिक महत्त्व लाभले आहे. अनेक वर्षांपासून या परिसराशी नागरिकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. त्यामुळे कमानीच्या नूतनीकरणासह परिसराचे करण्यात आलेले सौंदर्यीकरण नागरिकांसाठी केवळ विकासकाम न राहता भावनिक जिव्हाळ्याचा विषय ठरला.नव्या रूपातील कमान आणि परिसराची सजावट पाहताच उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अनेकांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आपल्या परिचित परिसराला इतके देखणे आणि आकर्षक स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहून काही नागरिक भावुकही झाले. विकासकामातून शहराच्या इतिहासाला आणि स्थानिक अस्मितेला नवी ओळख देण्याचा प्रयत्न झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
बैद बिरादरीकडून पठाण यांचे कृतज्ञतापूर्वक आभार
लोकार्पण सोहळ्यात बैद बिरादरीच्या वतीने आमदार साजिद खान पठाण यांचे विशेष आभार मानण्यात आले. परिसराच्या विकासासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल तसेच फतेह चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल बिरादरीच्या पदाधिकारी व नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी आमदार पठाण यांनी बैद बिरादरीसोबत असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा उल्लेख केला. “बैद बिरादरीने आजवर आपल्याला सातत्याने साथ दिली आहे. ही साथ आणि विश्वास भविष्यातही कायम राहावा,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजाने दिलेल्या प्रेमाचे आणि सहकार्याचे ऋण विकासकामांच्या माध्यमातून फेडण्याचा आपला प्रयत्न असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
नागरिकांच्या सहभागाने सोहळ्याला चार चाँद
उद्घाटन सोहळ्याला परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. जीशान हुसेन, मेहबूब खान उर्फ मब्बा पहलवान, आरिफ खान , जैनेव बी. शेख इब्राहिम, इलियाज खान उर्फ गुड्डू पठाण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.विशेष म्हणजे, फतेह चौक कमानीच्या लोकार्पणानंतर परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नव्या कमानीमुळे फतेह चौकाची ओळख अधिक उठावदार झाली असून, शहराच्या मध्यवर्ती भागातील या ऐतिहासिक ठिकाणाच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडली आहे.
वारसा जपत विकासाची नवी वाट
शहराचा विकास करताना केवळ नवीन बांधकामे उभारणे पुरेसे नसून, जुन्या वास्तू, ऐतिहासिक ठिकाणे आणि त्यांच्याशी जोडलेल्या लोकभावना जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. फतेह चौक कमानीचे झालेले सौंदर्यीकरण याच दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानले जात आहे. ऐतिहासिक वारशाला आधुनिकतेची जोड देत परिसराला आकर्षक रूप देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.फतेह चौकच्या नव्या रूपाचे लोकार्पण हा केवळ एका कमानीचा उद्घाटन सोहळा न राहता इतिहास, सामाजिक सलोखा आणि विकास यांचा संगम ठरला, अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानेही या कामाबद्दलची अपेक्षा आणि समाधान अधोरेखित झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे