
महापौर, उपमहापौर व सभापती यांच्या हस्ते पथदिवे हेल्पलाईनचे लोकार्पण
लातूर, 25 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर शहरासह विस्तारित परिसरातील नागरिकांना पथदिव्यांबाबतच्या तक्रारी नोंदविण्यासाठी आता महापालिका कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. बंद अथवा नादुरुस्त पथदिव्यांची तक्रार घरबसल्या नोंदविता यावी, यासाठी लातूर महानगरपालिकेने स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केली आहे. महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे आणि स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले यांच्या हस्ते या हेल्पलाईनचे लोकार्पण करण्यात आले.
आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार आणि महापौर जयश्री सोनकांबळे तसेच स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले यांच्या पुढाकारातून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. शहरातील पथदिवा बंद असल्यास नागरिकांना ७४००४ ४८८९९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा १८०० २०२ ३९ ९१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आहे.
लातूर महानगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात पथदिवे बसविण्यात आले आहेत. शहरातील रस्ते, चौक आणि विविध भागांमध्ये प्रकाशव्यवस्था उपलब्ध झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ झाली असून, रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी होण्यासही मदत होत आहे. मात्र, काही ठिकाणी पथदिवे बंद अथवा नादुरुस्त झाल्यानंतर त्यांच्या दुरुस्तीला विलंब होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या.
नागरिकांच्या या अडचणीची दखल घेत पथदिव्यांच्या तक्रारी तातडीने संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचविण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी महापालिका कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. दूरध्वनीद्वारे तक्रार नोंदविल्यानंतर संबंधित विभागाकडून त्याची दखल घेऊन पथदिव्याची दुरुस्ती करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
हेल्पलाईन सुविधेच्या लोकार्पणावेळी स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले यांनी स्वतः हेल्पलाईनच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर तसेच टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी करून सुविधा कार्यान्वित झाल्याची माहिती दिली. नागरिकांनी या सुविधेचा वापर करून बंद अथवा नादुरुस्त पथदिव्यांची माहिती महापालिकेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी सभागृह नेते विजयकुमार साबदे, माजी महापौर दीपक सुळ, नगरसेवक युनूस मोमीन, सचिन गायकवाड, मनोज थोरात, अतिष चिकटे, धोंडीराम यादव, सतीश साळुंके, अल्लाबक्ष शेख, तरबेज तांबोळी, आसिफ गोलंदाज, रोहित सोमवंशी यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि महापालिका अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis