
लातूर, 25 ऑगस्ट (हिं.स.) : शहरात उघड्यावर कचरा टाकणे किंवा कचरा जाळणे आता नागरिकांना चांगलेच महागात पडणार आहे. अशा प्रकारे शहरात कुठेही कचरा करणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई करण्याचे कडक निर्देश मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी दिले आहेत.
स्वच्छता व अतिक्रमण विभागाच्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला लातूर शहर मनपाच्या महापौर जयश्री भालचंद्र सोनकांबळे, मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी आणि विरोधी पक्षनेते देविदास काळे यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. अतिक्रमणधारकांना शेवटची संधीया बैठकीत शहरातील फुटपाथवर अतिक्रमण केलेल्या दुकानदार व व्यावसायिकांना कडक इशारा देण्यात आला आहे. रस्ते आणि फुटपाथ मोकळे करण्यासाठी दुकानदारांना आपले अतिक्रमण स्वतःहून हटवण्यासाठी ८ दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत अतिक्रमणे न हटवल्यास मनपा प्रशासन जेसीबी व पथकासह स्वतः कारवाई करून अतिक्रमण जमीनदोस्त करेल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
सिंगल युज प्लास्टिकवर कडक बंदीपर्यावरणाची हानी टाळण्यासाठी सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर आणि त्याची विक्री करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनपाचे पथक अशा प्लास्टिक धारकांवर कारवाई करून प्लास्टिक जप्त करणार आहे. आगामी सण-उत्सव प्लास्टिकमुक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्यासाठी नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे जाहीर आवाहन महापौर, आयुक्त आणि विरोधी पक्षनेत्यांनी लातूरच्या नागरिकांना केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis