


रायगड, 25 ऑगस्ट (हिं.स.)। आगामी गणेशोत्सव, ईद-ए-मिलादुन्नबी तसेच अन्य सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नेरळ परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेरळ पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. डीवायएसपी विशाल नेहुलकर आणि एपीआय राहुल वरुटे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आल्या.
गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादुन्नबीच्या काळात सर्व समाजघटकांनी परस्परांच्या भावना व धार्मिक परंपरांचा आदर राखून सण साजरे करावेत. कोणत्याही अफवा अथवा आक्षेपार्ह संदेशांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारा, वादग्रस्त अथवा समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर प्रसारित करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले. नेरळ परिसरात वाढत असलेल्या वाहतूक कोंडीचा मुद्दाही बैठकीत गांभीर्याने मांडण्यात आला. सण-उत्सवांच्या काळात मिरवणुका, नागरिकांची वाढणारी गर्दी आणि वाहनांची संख्या लक्षात घेता वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. मिरवणुकीचे मार्ग निश्चित करताना तसेच मंडप उभारताना वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी पोलिस आणि संबंधित यंत्रणेशी समन्वय साधण्याचे आवाहन करण्यात आले.
नेरळमध्ये सध्या केवळ एकच वाहतूक पोलीस कार्यरत असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. वाढती वाहतूक आणि सण-उत्सवांच्या काळातील गर्दी लक्षात घेता नेरळसाठी अतिरिक्त वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. वाहतूक नियंत्रणासाठी मनुष्यबळ वाढविण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, सणांच्या काळात नागरिक व वाहनचालकांना त्रास होऊ नये, यासाठी नेरळ परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी करून ते तातडीने बुजविण्यासाठी संबंधित विभागाला सूचना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. तसेच कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत आवश्यक त्या ठिकाणी नवीन पोलीस चौकी किंवा बूथ उभारण्यात यावे, अशी सूचनाही बैठकीत करण्यात आली. नेरळ परिसरात नव्याने राहण्यासाठी येणाऱ्या भाडेकरूंची घरमालकांनी योग्य माहिती घेऊन नोंद ठेवावी. तसेच भाडेकरूंची आवश्यक माहिती पोलिस प्रशासनाकडे उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
डीवायएसपी विशाल नेहुलकर यांनी सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. एपीआय राहुल वरुटे यांनी गणेश मंडळांनी नियमांचे पालन करून उत्सवाचे नियोजन करावे तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट केले. बैठकीला शांतता समितीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, उपस्थित होते.बैठक झाल्यावर नेरळ पोलीस ठाणे खांडा नेरळ बाजारपेठ अंबिका भुवन नाका ग्रामपंचायत ते नेरळ पोलीस ठाणे या मार्गे रूट मार्च काढण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)