
वर्धा25 ऑगस्ट (हिं.स.) वर्धा येथे काही दिवसापूर्वीच अन्न व औषध प्रशासनाने छापा घालून कमी दर्जाचे नेपाळी रिफाइंड सोयाबीन तेल जप्त केल्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे आता कारंजा परिसराशी जोडले जात असल्याचे समोर आले आहे. शहराबाहेर असलेल्या एका तेल रिपॅकिंग फॅक्टरीमध्ये नेपाळवरून येणाऱ्या संशयास्पद आणि कमी दर्जाच्या तेलाची मोठ्या प्रमाणावर रिपॅकिंग केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. हेच तेल कारंजा शहरासह काटोल, आर्वी व लगतच्या इतर शहरांमधील किराणा दुकानांमध्ये पुरवले जात असल्याने या तेलाच्या गुणवत्तेबाबत आणि नागरिकांच्या आरोग्याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दारत मिळणारा हा संशयास्पद, कमी दर्जाचा साठा आणून संबंधित फॅक्टरीमध्ये इतर पॅकिंगमध्ये भरला जातो. त्यानंतर कारंजा, काटोल, आर्वी या भागांतील स्थानिक बाजारपेठेत त्याची सर्रास विक्री केली जात आहे. अत्यंत अस्वच्छ डब्यांमधून आयात होणाऱ्या आणि मानकांची पूर्तता न करणाऱ्या या तेलामुळे नागरिकांच्या आरोग्याशी उघडपणे खेळ सुरू असल्याचे बोलले जात आहे. वर्ध्यात अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत कारवाई केली असली, तरी कारंजा, काटोल आणि आर्वी परिसराला पुरवठा करणाऱ्या या फॅक्टरीकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. संबंधित विभागाने तातडीने या फॅक्टरीची झाडाझडती घेऊन तेलाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत आणि दोषींवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
----------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी