
परभणी, 25 ऑगस्ट (हिं.स.)। परभणी जिल्ह्यातील भ्रष्ट वैद्यकीय अधिकार्यांचे तात्काळ निलंबन करून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
प्रितम वाकळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे जिल्हा परिषद परिसरात काही काळ घोषणाबाजीने दणाणून गेला. जिल्हा वैद्यकीय विभागातील मानव विकास कार्यक्रमांतर्गत गर्भवती माता व नवजात अर्भकांसाठी उपलब्ध असलेल्या निधीत तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच स्थानिक वैद्यकीय अधिकार्यांनी संगनमत करून अफरातफर व भ्रष्टाचार केल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. या कथित गैरव्यवहाराची तातडीने चौकशी करून दोषी आढळणार्या अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनादरम्यान संबंधित कथित भ्रष्टाचाराचे पुरावे प्रशासनासमोर सादर करण्यात आले. तसेच दोषी वैद्यकीय अधिकार्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे जिल्हा परिषद परिसरात आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis