रत्नागिरीत संस्कृत सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांना प्रारंभ
रत्नागिरी, 25 ऑगस्ट (हिं.स.) । संस्कृतभारती दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने रत्नागिरी शहरात आजपासून ३१ ऑगस्टपर्यंत संस्कृत सप्ताह महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने संस्कृतप्रेमींना विविध दर्जेदार कार्यक्रमांचा अनुभव घे
रत्नागिरीत संस्कृत सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांना प्रारंभ


रत्नागिरी, 25 ऑगस्ट (हिं.स.) । संस्कृतभारती दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने रत्नागिरी शहरात आजपासून ३१ ऑगस्टपर्यंत संस्कृत सप्ताह महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने संस्कृतप्रेमींना विविध दर्जेदार कार्यक्रमांचा अनुभव घेता येणार आहे.

या महोत्सवाचा प्रारंभ शालांतर्गत निवडक १० सुभाषितांच्या पठणाने झाला. २६ ऑगस्ट रोजी बाळासाहेब ठाकरे यूथ ॲक्टिव्हिटी सेंटर (साळवी स्टॉप) येथे नगर संस्कृत दिनोत्सव साजरा केला जाईल. या कार्यक्रमात रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असून शालेय विद्यार्थ्यांचे प्रतिभा प्रदर्शन आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन होईल. नगरसेवक सौरभ मलुष्टे व नगरसेविका सौ. पूजा पवारही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. २७ ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह (शिवाजीनगर – आयटीआय जोडरस्ता) येथे नारायणी पठण मंडळाच्या भगिनी कृष्णाशी संबंधित स्तोत्रांच्या पठणाचा ‘कृष्णरंग’ हा कार्यक्रम सादर करतील. २८ ऑगस्ट रोजी संस्कृतभारतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, कोकण प्रांताचे विद्वत्परिषत्प्रमुख आणि गोवा येथील शिक्षक महाबलजी भट्ट ‘धन्यो गृहस्थाश्रम:’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यान देणार आहेत. गूगल मीटच्या माध्यमातून हा कार्यक्रम होईल.

महोत्सवाच्या उत्तरार्धात, २९ ऑगस्ट रोजी ल. वि. केळकर वसतिगृह (जोशी पाळंद) येथे सुरू असलेल्या संस्कृत संभाषण शिबिराचा समारोप होईल. ३० ऑगस्ट रोजी माधवराव मुळे भवन (झाडगाव) येथे ‘संस्कृतगीतसंध्या’ हा विशेष कार्यक्रम होणार असून, यात प्रसिद्ध गायिका सौ. मुग्धा भट-सामंत मराठीतील प्रसिद्ध भक्तिगीते व नाट्यगीते यांच्या संस्कृत अनुवादित गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करतील. या कार्यक्रमात हेरंब जोगळेकर तबलासाथ व श्रीरंग जोगळेकर संवादिनी साथ करणार आहेत. तसेच ३१ ऑगस्ट रोजी अधिवक्ता परिषद व संस्कृतभारती यांच्या संयुक्त विद्यमाने रंजन मंदिर (शिर्के प्रशाला) येथे ॲड. फणसेकर यांचे ‘प्राचीन भारतीय न्यायव्यवस्था’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले आहे.

या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून महोत्सवाचा आस्वाद घेण्याचे नम्र आवाहन संस्कृतभारती दक्षिण रत्नागिरीतर्फे रत्नागिरीतील सर्व संस्कृतप्रेमी व नागरिकांना करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande