
यवतमाळ, 25 ऑगस्ट (हिं.स.)। कळंब तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असलेल्या डोंगरखरडा येथील प्राथमिक आरोग्य पथकाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी नसल्याने येथील आरोग्य सेवा अक्षरशः ''सलाईनवर'' आली आहे. सर्व कारभार एका शिपायाच्या हाती असल्याने रुग्णांच्या जिवाशी मोठा खेळ सुरू असून, प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे संतापलेले नागरिक आता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
डोंगरखरडा व परिसरातील नागरिकांना सध्या अत्यंत विदारक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. येथील प्राथमिक आरोग्य पथकामध्ये मागील अनेक महिन्यांपासून कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नाहीत. सर्व कारभार केवळ ''प्रभारी'' अधिकाऱ्यांवर ढकलण्यात आला आहे. प्रत्यक्ष उपचारासाठी डॉक्टरच उपलब्ध नसल्याने, चक्क आरोग्य पथकातील शिपाईच सर्व यंत्रणा चालवत असल्याचे गंभीर चित्र सध्या डोंगरखरडा येथे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळतोय की नाही, हा मोठा संशोधनाचा विषय बनला आहे.
डोंगरखरडा हे तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे, अतिदुर्गम व आदिवासी बहुल गाव आहे. साधारण ३० ते ४० वर्षांपूर्वी येथे सुसज्ज अशी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आणि सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत्या. मात्र, स्थानिक राजकारण्यांच्या अनास्थेमुळे हे आरोग्य केंद्र काही वर्षांपूर्वी ''मेठीखेडा'' येथे हलविण्यात आले. तेव्हापासून डोंगरखरडा या मोठ्या गावाची बोळवण केवळ एका ''आरोग्य पथकावर'' करण्यात आली आहे. यामुळे गैरसोय होत आहे.ग्रामीण रुग्णालयाची नितांत आवश्यकता डोंगरखरडा ही परिसरातील एक मोठी बाजारपेठ आहे. येथे शाळा, महाविद्यालये आणि अनेक खाजगी दवाखाने आहेत. आजूबाजूच्या सुमारे दहा ते बारा गावांतील नागरिकांचा या गावाशी रोजचा संपर्क असतो. वाढती लोकसंख्या आणि आजूबाजूच्या गावांची अवलंबित्व पाहता, येथे ''ग्रामीण रुग्णालय'' उभारणे काळाची गरज आहे. मात्र, ग्रामीण रुग्णालय तर सोडाच, पण हिरावून नेलेले प्राथमिक आरोग्य केंद्रही परत आणण्यात स्थानिक नेत्यांना अपयश आले आहे. गावचे पुढारी केवळ आपले ''कपडे चमकवण्यात'' धन्यता मानत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. लवकरात लवकर डोंगरखरडा येथील प्राथमिक आरोग्य पथकावर वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉक्टर जाधव यांची नियुक्ती करण्यात येईल, जेणेकरून नागरिकांची गैरसोय टळेल. असे तालुका आरोग्य अधिकारी रामटेके यांनी सांगितले.
--------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी