बालरोग विभागाला आपत्कालीन मार्गच नाही; वर्धा जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक वास्तव
वर्धा, 25 ऑगस्ट (हिं.स.) अमरावती जिल्हा महिला रुग्णालयात मध्यरात्री भीषण आग लागल्याच्या घटनेनंतर वर्धा जिल्हा रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा आणि इतर सुविधांचा आढावा घेण्यात आला. यात सुविधांच्या नावावर येथे बारागडे बोंब असल्याचे दिसून आले. जिल्हा रुग्ण
बालरोग विभागाला आपत्कालीन मार्गच नाही; वर्धा जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक वास्तव


वर्धा, 25 ऑगस्ट (हिं.स.) अमरावती जिल्हा महिला रुग्णालयात मध्यरात्री भीषण आग लागल्याच्या घटनेनंतर वर्धा जिल्हा रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा आणि इतर सुविधांचा आढावा घेण्यात आला. यात सुविधांच्या नावावर येथे बारागडे बोंब असल्याचे दिसून आले. जिल्हा रुग्णालयात इमारत क्रमांक दोनमध्ये दुसऱ्या माळ्यावर बालरोग विभाग आहे. येथे आग लागल्यास बाहेर पडण्याकरिता आपातकालीन मार्ग नसल्याचे पुढे आले. यासंदर्भात लवकरच कारवाई करू, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्हा सामान्य रुग्णालयात गत सहा महिन्यांत दोनवेळा आग लागण्याची घटना घडली. त्यात मोठे नुकसान झाले होते. या घटनांनंतरही रुग्णालय प्रशासनाने अग्निप्रतिबंधक उपाययोजनांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. येथे असलेल्या पायऱ्यांवर अग्निप्रतिबंधक उपकरणे लावण्यात आली आहेत. परंतु, त्यांच्या मुळात नसलेल्या सुविधांमुळे असलेली उपकरणे कुचकामी ठरतात. नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाकडून वेळोवेळी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याने रुग्णालय प्रशासन रुग्णांच्या सुविधेबाबत किती दक्ष आहे. हे समोर आल्याशिवाय राहत नाही. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या सुरक्षेशी हा प्रकार थेट संबंधित असल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप व्यक्त होत आहे.

बांधकाम विभागाशी २६ वेळ पत्रव्यवहार जिल्हा रुग्णालयाच्या इमारत क्रमांक दोनमध्ये क्ष-किरण विभाग आहे. येथे कृष्णा डायग्नोस्टिक केंद्र सुरू करण्यात आले आहे. केंद्राच्या बांधकामादरम्यान फायर स्प्रिंकलरची लाईन तोडण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येते. या लाईनवरील स्प्रिंकलर पाइपला मोटारपंप जोडण्यात आलेला नाही. परिणामी गत तीन वर्षांपासून ही अग्निसुरक्षा यंत्रणा अपूर्ण असल्याची माहिती आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाशी रुग्णालय प्रशासनाकडून तब्बल २६ बेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यांच्याकडून यावर कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. एवढेच नाही तर त्यांनी इमारतीत किती ठिकाणी अग्निप्रतिबंधित बंब बसविले आहेत, त्या संदर्भातही माहिती दिलेली नसल्याचे सांगण्यात आले.

नवजात शिशू दक्षता विभागात २० खाटा

जिल्हा रुग्णालयात असलेल्या नवजात शिशू दक्षत विभागात २० खाटांची सुविधा करण्यात आली आहे. सध्या येथे १२ रुग्ण आहेत. त्यातील सहा गंभीर आहेत. त्यांच्या देखभालीकरिता येथे २४ तास एक डॉक्टर आणि सकाळ, दुपारच्या सत्रात तीन परिचारिका असतात. रात्रीला दोन परिचारिका असतात. शिवाय एक बालरोगतज्ज्ञ ‘ऑन कॉल’ असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

रुग्णालयात ९२ सिलिंडर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगिवर ताबा मिळविण्याकरिता रुग्णालयाच्या विविध वॉर्डात ९२ सिलिंडर आहेत. यात यात ४ किलो वजनाचे ८६ तर ६ किलो वजनाचे ४ सिलिंडर आहेत. वेळप्रसंगी ते सिलिंडर कसे वापरायचे याचे पुरेपूर प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. सोबतच कार्बनडाय ऑक्साईडचे ६ सिलिंडर आहेत.

जिल्हा रुग्णालयात बालरोग विभागाला आपातकालीन मार्ग नसल्याचे तपासणीत पुढे आले. त्या संदर्भात लवकरच कारवाई करण्यात येईल. शिवाय सध्या रखडलेली अग्निप्रतिबंधक उपाययोजना कार्यान्वित करण्याकरिता प्रयत्न करण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ही व्यवस्था सध्या रखडली आहे. या संदर्भात आतापर्यंत त्यांना २६ वेळा पत्र पाठविण्यात आले आहे. असे असताना त्यांच्याकडून यावर कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. सद्यस्थितीत आपातकालीन परिस्थिती हाताळण्याकरिता अग्निप्रतिबंधक सिलिंडर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. -राजसिंह पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande