
पुणे, 25 ऑगस्ट (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘सृष्टिबंध बांबू राखी महोत्सव’ आणि बांबूच्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यापीठाच्या कौशल्य विकास विभागातील बांबू हँडिक्राफ्ट आर्ट युनिट आणि ‘मेळघाट सपोर्ट ग्रुप’ यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.हे प्रदर्शन १९ ते २८ ऑगस्टदरम्यान दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
मेळघाटातील कोरकू आदिवासी महिलांनी हस्तकलेतून तयार केलेल्या पर्यावरणपूरक बांबू राख्या तसेच बांबूपासून तयार केलेल्या विविध वस्तू प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या माध्यमातून आदिवासी महिलांच्या कलेला बाजारपेठ उपलब्ध करून देतानाच त्यांना रोजगार आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.गेल्या तीन वर्षांपासून विद्यापीठाच्या बांबू हँडिक्राफ्ट युनिटमार्फत विद्यार्थ्यांना बांबूच्या वस्तू तयार करण्याचे दोन क्रेडिट पॉइंटचे प्रशिक्षण दिले जात आहे. आतापर्यंत विद्यापीठातील सुमारे २५० विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तसेच विद्यापीठाशी संलग्न नाशिक आणि नगर जिल्ह्यातील १० महाविद्यालयांमधील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनाही बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.पर्यावरणपूरक राख्यांचा वापर करून निसर्ग संवर्धनाला हातभार लावण्याबरोबरच मेळघाटातील आदिवासी महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा संदेश या महोत्सवातून देण्यात येत आहे. नागरिक आणि विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु