
वर्धा 28 ऑगस्ट (हिं.स.)।
शासनाकडून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ७४ हजार खाती अपलोड करण्यात आली. त्यातील ३२ हजार ५५२ शेतकऱ्यांची खाती तपासण्यात आली. या आकडेवारीवरून शेतकऱ्यांची अद्याप निम्मी खाती तपासण्यात यायची असल्याने जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला ते सांगणे कठीण आहे.
शासनाच्या वतीने कर्जमाफीच्या दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. दुसऱ्या यादीत जिल्ह्यातील १२ हजार ६१५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जाहीर झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या यादीत जिल्ह्यातील २३ हजार ३३० शेतकऱ्यांना २३० कोटी ८२ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात काही त्रु्ट्या नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाल्याचे उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. शासनाने जाहीर केलेल्या या कर्जमाफीचा जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार याबाबत अद्याप अंतिम संख्या स्पष्ट झाली नाही. जिल्ह्यात नोंद असलेल्या शेतकऱ्यांच्या ७४ हजार बँक खात्यांची तपासणी झाल्यानंतरच ती संख्या पुढे येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या खात्यांची तपासणी सुरू असून शिल्लक खात्यांपैकी किती शेतकरी हयात आहेत आणि किती नाही याची माहिती स्पष्ट झाल्यानंतर या कर्जमाफीच्या अंतिम संख्येबाबत माहिती मिळणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे.
अनेक शेतकऱ्यांचे खाते अपडेट नाहीत
कर्जमाफी झालेल्या अनेक शेतकऱ्यांचे खाते अपडेट करण्यात आले नाहीत. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या लाभापासून दूर रहावे लागत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या इ केवायसीचा प्रश्न आहे. तर काही शेतकऱ्यांची खाती आधार अपडेट नाही. जिल्ह्यात अद्याप या अपडेटेशनची प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांनी त्यांची खाती अपडेट ठेवावी असे आवाहन उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी