
रत्नागिरी, 28 ऑगस्ट (हिं.स.) : तिवरे (ता. राजापूर) येथील वै. हभप महादेव काशिबा दळवी बोवा संस्थेच्या वतीने ओझर आणि वाटूळ येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकलेला वाव मिळावा, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विषयांबाबत जागरूकता वाढावी, या उद्देशाने या स्पर्धा घेण्यात आल्या.
ओझर येथील माध्यमिक विद्यामंदिर आणि वाटूळ येथील आदर्श विद्या मंदिरात पाचवी ते सातवी तसेच आठवी ते दहावी अशा दोन गटांत स्पर्धा घेण्यात आल्या. पहिल्या गटासाठी ‘विद्यार्थ्यांच्या जीवनात गुरूंचे महत्त्व’, ‘शेतकरी-जगाचा पोशिंदा’, ‘संत ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान-आजच्या काळाची गरज’, ‘राष्ट्रध्वज-माझा अभिमान’ आणि ‘मोबाइल नको, मला खेळायचंय’ हे विषय देण्यात आले होते.
दुसऱ्या गटासाठी ‘आजच्या आधुनिक युगात संतांच्या विचारांचे महत्त्व’, ‘पर्यावरण रक्षण व संत विचारांमधील समतोल’, ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचे व्यवस्थापन’, ‘पर्यावरण रक्षण आणि माझा सहभाग’ तसेच ‘संत ज्ञानेश्वर महाराज-अवघ्या विश्वाची माऊली’ हे विषय ठेवण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने विषय मांडत प्रभावी वक्तृत्व सादर केले. विषयाची मांडणी, भाषेवरील प्रभुत्व, आत्मविश्वास आणि सादरीकरणाची शैली यामुळे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेचे परीक्षण ओझर माध्यमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक मुरलीधर खानविलकर व पाटील सर यांनी केले. वाटूळ येथील आदर्श विद्या मंदिरात मुख्याध्यापक संदीप मयेकर, आनंद त्रिपाठी आणि सौ. कल्पना तुमलाम यांनी परीक्षण केले.
विजेत्यांची नावे
माध्यमिक विद्यामंदिर, ओझर (इयत्ता आठवी ते दहावी) :
दिया मंगेश गुरव, श्रेया श्रावण मोडक आणि गौरी प्रवीण तरळ.
आदर्श विद्या मंदिर, वाटूळ (इयत्ता पाचवी ते सातवी) :
संस्कृती मनोहर मांडवकर, शिवन्या संदीप भुरके आणि रिद्धी महेश गावखडकर.
आदर्श विद्या मंदिर, वाटूळ (इयत्ता आठवी ते दहावी) :
मृण्मयी रूपेश चव्हाण, मयूरेश रामचंद्र इंदुलकर आणि सिद्धी महेश गावखडकर.
पारितोषिक वितरण सोहळ्यास ओझरचे सरपंच विकास रेघे, वाटूळच्या सरपंच सौ. नीता चव्हाण, महादेव काशिबा दळवी बोवा संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी