
अमरावती, 28 ऑगस्ट (हिं.स.)
जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील भांबोरा शिवारात वाघाच्या हल्ल्यात ५५ वर्षीय शेतकरी चरणदास इखे यांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात काम करण्यासाठी गेलेल्या चरणदास इखे यांच्यावर वाघाने अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेने भांबोरा परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये वाघाच्या दहशतीमुळे चिंतेचे वातावरण आहे.घटनेची माहिती मिळताच वनविभाग, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करून आवश्यक कार्यवाही सुरू केली. दरम्यान, या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच स्थानिक नेत्या सौ. आरती राजेश वानखडे यांनी घटनास्थळी भेट देत मृत शेतकरी चरणदास इखे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.यावेळी सौ. आरती वानखडे यांनी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना शासकीय स्तरावर योग्य मदत मिळावी, तसेच मृताच्या वारसाला वनविभागात शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी ठाम मागणी प्रशासनाकडे केली. या मागणीची प्रशासनाने दखल घेत मृताच्या वारसाला तातडीने वनविभागात कंत्राटी तत्त्वावर रुजू करून घेण्याचे मान्य केले असून, त्यांना भविष्यात कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर पाठविण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.दरम्यान, भांबोरा शिवारात वाघाचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतात कामासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, ग्रामस्थांनी या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. वनविभागाने परिसरात गस्त वाढवून नागरिकांनी सतर्क राहावे, अशी मागणीही होत आहे.या घटनेमुळे वन्यजीवांचा वाढता मानवी वस्तीकडे वावर आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मृत शेतकरी चरणदास इखे यांच्या कुटुंबाला न्याय व तातडीची मदत मिळावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भांबोरा परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
१० जवानांचे पथक तैनात
प्राथमिकदृष्ट्या हा हल्ला वाघिणीनेच केला असावा. वर्धा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका वाघिणीने हल्ला केला होता. संबंधित वाघिणीला पकडण्याची परवानगी वर्धा वन विभागाला मिळाली आहे.वाघिणीच्या शोधासाठी भांबोरा तसेच परिसरातील गावांमध्ये २४ तास गस्त सुरू करण्यात आली आहे. प्रत्येकी दहा जवानांचे पथक तैनात करण्यात आले असून, ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनही शोधमोहीम राबवली जात आहे. - मयुर भैलूमे, एसीएफ मोर्शी.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी