


न्यूयॉर्क, 30 ऑगस्ट (हिं.स.) - भारत शतकानुशतके ‘वसुधैव कुटुंबकम्’ या अमूल्य विचाराने जगाकडे पाहतो. त्यामुळे धर्म आणि उपासनेच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात; मात्र संपूर्ण मानवजात एकच आहे, असे आम्ही मानतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. शनिवारी न्यूयॉर्कमध्ये आयोजित ‘वन वर्ल्ड, वन ह्युमॅनिटी’ या कार्यक्रमातून त्यांनी न्यूयाॅर्कसह जगभरातील समुदायांशी संवाद साधला. या कार्यक्रमात अमेरिकेतील ३९ राज्यांतील, ८५० शहरांतील तसेच २९ देशांतील सुमारे ६ हजार प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. स्थानिक २५० संस्थांनी हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. विविधतेतून एकता, विचारांतून समन्वय आणि कृतीतून मानवतेचा संदेश, याच भारतीय मूल्यांचा जागतिक प्रसार करण्याचे आवाहन डॉ. भागवत यांनी केले.
न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये आयोजित 'युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन' (Universal Oneness Celebration) कार्यक्रमात 5,000 हून अधिक भारतीय वंशाचे अमेरिकन सहभागी झाले होते. याचे आयोजन अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग (AHEAD) ने केले होते. या कार्यक्रमात 30 देशांतील 180 धार्मिक नेते उपस्थित होते. मोहन भागवत या आठवड्याच्या सुरुवातीला न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले. त्यांच्या तीन देशांच्या जागतिक संपर्क दौऱ्याचा हा पहिला टप्पा आहे. अमेरिकेनंतर ते कॅनडा आणि ब्रिटनलाही भेट देणार आहेत. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा एक भाग म्हणून, परदेशात कार्यरत असलेल्या विविध संस्थांच्या निमंत्रणावरून त्यांचा हा दौरा होत आहे. विशेष म्हणजे, भागवत यांच्या संबोधनापूर्वी टाइम्स स्क्वेअरवरील मुख्य बिलबोर्डवर त्यांची छायाचित्रे झळकली. त्यामुळे या कार्यक्रमाची आणि त्यांच्या दौऱ्याची विशेष चर्चा झाली.
मोहन भागवत पुढे म्हणाले की, हा मेळावा 'एकता' साजरी करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. आपण येथे एकतेचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. यासाठी न्यूयॉर्क हे अत्यंत योग्य ठिकाण आहे; कारण अमेरिका आणि भारत हे दोन्ही देश 'विविधता' या संकल्पनेशी जोडलेले आहेत. जेव्हा आपण अमेरिकेबद्दल म्हणजेच 'युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका'बद्दल बोलतो, तेव्हा एक शब्द प्रामुख्याने समोर येतो - 'बहुलतावाद' आणि जेव्हा आपण भारताविषयी बोलतो, तेव्हा आणखी एक संकल्पना किंवा वाक्प्रचार समोर येतो - 'विविधतेतील एकता'.
भागवत यांनी २०१८ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमाचा संदर्भ दिला. त्या वेळी उपस्थित असलेल्या काही मुस्लिमांनी त्यांना विचारले होते, आपण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडता, मग मुस्लिमांना देशाबाहेर काढले जाईल का? त्यावर आपण स्पष्टपणे उत्तर दिले होते, नाही, हे हिंदुत्व नाही. भारतात मुस्लिम नसावेत, असे ज्याला वाटते, तो खरा हिंदूच नाही. धर्मगुरूंच्या या आंतरधर्मीय संमेलनाला संबोधित करताना भागवत म्हणाले की, सत्य एकच आहे; मात्र प्रत्येक व्यक्ती आपल्या आकलन, अनुभव आणि दृष्टिकोनानुसार त्या सत्याची वेगवेगळ्या प्रकारे मांडणी करते. आपण माणसं आहोत आणि आपल्या मेंदूमध्ये तयार झालेल्या सॉफ्टवेअरचे आपण काही अंशी कैदी आहोत. आपण स्वतः धार्मिक विद्वान किंवा धार्मिक प्राधिकरण नसल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, ज्या समाजात आपण कार्य करतो, त्या समाजाची परंपरा अशी आहे की धर्म वेगवेगळे असू शकतात, पण मानवता एकच असते. सत्य एक आहे आणि मानवता त्याच सत्याची निर्मिती आहे. त्यामुळे माणुसकीही एकच आहे.
भागवत यांनी जगातील विविध धर्म आणि त्यांच्या धार्मिक परंपरांचाही उल्लेख केला. आजच्या काळात धर्माची ओळख मोठ्या प्रमाणावर त्यातील रीतीरिवाज, प्रथा आणि धार्मिक अनुष्ठानांवरून केली जाते. धार्मिक शिस्त आणि अनुष्ठाने ही एखाद्या व्यक्तीला आध्यात्मिक मार्गावर पुढे जाण्यासाठी महत्त्वाचे माध्यम ठरू शकतात, असेही त्यांनी मान्य केले. विविधतेत एकता ही भारताची पारंपरिक विचारसरणी आहे आणि देश वेळोवेळी संपूर्ण जगाला याची जाणीव करून देत आहे. विचार करण्याची क्षमता मानवासाठी एक वरदान आहे. योग्य विचार माणसाला देवाजवळ घेऊन जातात, तर चुकीचे विचार त्याला प्राण्यांच्या जवळ घेऊन जातात.
संघात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांना उद्देशून भागवत यांनी स्पष्ट संदेश दिला की, काहीतरी मिळवण्याच्या अपेक्षेने संघात येऊ नये; संघात केवळ सेवा करण्याची भावना असलेल्या व्यक्तींसाठीच स्थान आहे. समाजाच्या दिशादर्शनासाठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले, जर आपण समाजाला शिक्षित करणे थांबवले, तर समाजात भटकाव निर्माण होऊ लागतो. त्यांच्या या वक्तव्यातून मानवतेची एकता, परस्पर आदर, सेवा आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांवर त्यांनी दिलेला भर स्पष्टपणे दिसून आला.
ते पुढे म्हणाले की, धर्म हे असे तत्त्व आहे जे संपूर्ण जगात समतोल राखते. भारतात 'धर्म' म्हणून ओळखली जाणारी संकल्पना केवळ उपासना पद्धती किंवा विशिष्ट पंथापुरती मर्यादित नाही; ती अत्यंत व्यापक असून संपूर्ण विश्वाला आधार देणाऱ्या तत्त्वाचे प्रतिनिधित्व करते. धर्म म्हणजे केवळ उपासना किंवा एखादा पंथ नव्हे, तर तो या सर्वांच्या पलीकडचा आहे. हा असा नियम किंवा तत्त्व आहे ज्यावर हे विश्व आधारलेले आहे. जीवनातील विविध परिस्थिती आणि विरोधाभासांच्या दरम्यान व्यक्तीला समतोल राखण्यास धर्म मदत करतो. अमेरिकेत राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या भारतीयांचे प्राथमिक कर्तव्य अमेरिकेप्रती म्हणजेच त्यांच्या 'कर्मभूमी'प्रती आहे. तुम्ही अमेरिकेत आहात, तिथे राहता आणि तिथेच उत्पन्न मिळवता, त्यामुळे तुम्ही अमेरिकन आहात आणि तुम्ही अमेरिकेशी एकनिष्ठ राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांच्या मते, न्यूयॉर्कमधील हा कार्यक्रम विविध धर्म आणि समुदायांतील लोकांना एका व्यासपीठावर आणणारा आंतरधर्मीय संवादाचा उपक्रम आहे. खुले संवाद, परस्पर आदर, एकमेकांना समजून घेणे आणि सामायिक उद्दिष्टांना प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी