
काठमांडू, 30 ऑगस्ट (हिं.स.)।नेपाळमध्ये आलेल्या भीषण आपत्तीनंतर पुन्हा एकदा भोटेकोशी नदीची पाणीपातळी वाढू लागली आहे. पाण्याचा अचानक वाढलेला प्रवाह आणि नदीतून येणाऱ्या जोरदार गर्जनेचा आवाज लक्षात घेता, राष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीआरआरएमए ) रसुवा, नुवाकोट आणि धादिंग जिल्ह्यांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे.
भोटेकोशी नदीची वाढती पाणीपातळी लक्षात घेता, अधिकाऱ्यांनी नदीच्या खालच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना तसेच मदत आणि बचाव पथकांना अत्यंत सावध राहण्याचे आणि सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. रसुवा जिल्ह्यात नदीकाठच्या भागात तसेच नेपाळ-चीन सीमेच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना नदीच्या पाणीपातळीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने नुवाकोट आणि धादिंग जिल्ह्यांमध्ये नदीच्या खोऱ्याजवळील आपत्कालीन सेवा आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांना स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे.
एनडीआरआरएमए ने सोशल मीडियावर माहिती देताना म्हटले, “रसुवा जिल्हा प्रशासन कार्यालयाला भोटेकोशी नदीला पूर आला असून नदीचा प्रवाह वेगाने वाढल्याचा आणि नदीच्या जोरदार प्रवाहाचा आवाज ऐकू आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे रसुवा, नुवाकोट आणि धादिंगमधील नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अतिरिक्त माहिती मिळताच आम्ही नवीन अपडेट जारी करू.”
26 ऑगस्ट रोजी आलेल्या फ्लॅश फ्लडमध्ये सर्वाधिक प्रभावित झालेल्या या तीन जिल्ह्यांसाठी ही नवा इशारा जारी करण्यात आला आहे. नेपाळमध्ये भोटेकोशी नदीच्या विध्वंसक पुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. या आपत्तीत आतापर्यंत मृतांचा आकडा 675 वर पोहोचला असून 2,418 जण बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत 287 भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाचे 128 नागरिक (PIOs) देखील बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
मदत आणि बचावकार्य सुरू असतानाच रसुवा येथील एका जलविद्युत प्रकल्पातून चार भारतीय नागरिक—रिपु कुमार, चनेश्वर नर्जरी, कृपा शंकर आणि मोहम्मद मिन्हाजुद्दीन—यांची सुखरूप सुटका करून त्यांना काठमांडू येथे आणण्यात आले आहे. यामुळे पूरग्रस्त भागातून बचावलेल्या भारतीय नागरिकांची एकूण संख्या 88 झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode