अमरावती–नागपूर महामार्गावरील जीवघेणे खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी
अमरावती, ४ ऑगस्ट (हिं.स.) : अमरावती–नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पावसामुळे निर्माण झालेल्या जीवघेण्या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करून ते बुजवावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), तिवसा तालुक्याच्या वतीने भारतीय
अमरावती–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेणे खड्डे तात्काळ बुजविण्याची मागणी..


अमरावती, ४ ऑगस्ट (हिं.स.) : अमरावती–नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पावसामुळे निर्माण झालेल्या जीवघेण्या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करून ते बुजवावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), तिवसा तालुक्याच्या वतीने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अमरावती विभागाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनानुसार, अमरावती–नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात ट्रक, बस, ट्रेलर आणि इतर अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. मात्र, सततच्या पावसामुळे महामार्गावरील अनेक ठिकाणी मोठे व जीवघेणे खड्डे पडले असून त्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. नागपूर ते अमरावती मार्गावरील टोलनाक्यांमधून नियमित टोल वसूल केला जात असतानाही रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

विशेषतः मोझरी बायपास परिसर, मोझरी बसस्थानकाजवळ तसेच वाडेकर पेट्रोल पंपाजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे मोठ्या अपघाताची शक्यता वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महामार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजवून रस्ता सुरक्षित करावा. तसेच तिवसा शहरातील स्ट्रीट लाईट आणि स्वच्छतेची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दरम्यान, संबंधित विभागाने तात्काळ कार्यवाही न केल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जनहितासाठी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande