लातूर : काँग्रेसविरोधात भाजपाचे महापालिकेत तीव्र आंदोलन
लातूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर शहरातील कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, रस्ते यांसह २८ विकासकामांचे प्रश्न प्रलंबित असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून महापुरुषांच्या पुतळ्यांच्या मुद्यावर राजकारण करण्यात आल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाने बुध
भाजपचे आंदोलन


लातूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)।

लातूर शहरातील कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, रस्ते यांसह २८ विकासकामांचे प्रश्न प्रलंबित असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून महापुरुषांच्या पुतळ्यांच्या मुद्यावर राजकारण करण्यात आल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाने बुधवारी महापालिकेत सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र निदर्शने केली.

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, सर्वसाधारण सभेत केवळ एका विषयावर चर्चा करून इतर महत्त्वाच्या विकासविषयक मुद्द्यांना बगल देण्यात आली. अवघ्या १५ मिनिटांत सभा आटोपून अनेक विषय मंजूर करण्यात आले. त्यामुळे शहराच्या विकास प्रक्रियेला खीळ घालण्याचे काम काँग्रेसकडून होत असल्याचा आरोपही भाजपाने केला.

सभेनंतर भाजपाच्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महापालिका सभागृहात ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. लातूरच्या विकासाचा गळा घोटणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा धिक्कार असो, लोकशाहीची गळचेपी करणाऱ्यांचा धिक्कार असो, संविधानाचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार असो, तसेच लातूरकरांच्या मूलभूत प्रश्नांपासून पळ काढणाऱ्या महापौरांचा धिक्कार असो, अशा घोषणांनी सभागृह परिसर दणाणून गेला.

या आंदोलनात भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते देविदास काळे, गटनेते दीपक मठपती, महामंत्री प्रवीण कस्तुरे, नगरसेविका रागिणीताई यादव तसेच नगरसेवक रविशंकर जाधव, गिरीश पाटील, शोभाताई पाटील, अनंत गायकवाड, प्रदीप मोरे, भिमाशंकर बेंबळकर, स्वाती घोरपडे, प्रेरणाताई होणराव, करुणाताई शिंदे, गणेश गवारे, आदिती पाटील कव्हेकर, उद्धव तेलंगे, शिला पाटील, शितल मालू, विनज जाकते, राजेश्री धोत्रे, संगिता मिरचे, ऋषिकेश राजे, सत्यवती चेवले, ज्योती आवस्कर, जयश्री बाहेती यांच्यासह भाजपाचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

--

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande