
रत्नागिरी, 4 ऑगस्ट (हिं.स.) । आवश्यक परवानगी नसताना खतांचा साठा केल्याप्रकरणी कृषी विभागाने रत्नागिरी तालुक्यातील खालगाव-जाकादेवी येथील खत विक्री केंद्रावर कारवाई केली. तपासणीदरम्यान विविध प्रकारच्या खतांचा ५८ हजार ९६० रुपये किमतीचा साठा आढळून आला. या प्रकरणी दुकान मालक मिलिंद केशव सावंत यांच्याविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृषी विभागाकडून संबंधित खत विक्री केंद्राची तपासणी करण्यात आली. यावेळी खतांची विक्री आणि साठवणूक करण्यासाठी आवश्यक असलेला वैध परवाना नसतानाही दुकानात विविध प्रकारच्या खतांचा साठा ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पंचनामा करून सुमारे ५८ हजार ९६० रुपये किमतीचा खतसाठा जप्त केला.
या प्रकरणी राजेंद्र कुंगेर यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मिलिंद सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
प्राथमिक तपासणीत खत नियंत्रण आदेश तसेच खत विक्री आणि साठवणुकीशी संबंधित नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी