सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव बार्शीत; १४ वर्षांनंतर ‘भगवंत नगरी’ला यजमानपद
श्री शिवाजी महाविद्यालयात आयोजन; दोन हजारांहून अधिक विद्यार्थी-कलाकारांचा सहभाग अपेक्षित सोलापूर, ४ ऑगस्ट (हिं.स.) :पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बहुप्रतिक्षित २२ व्या युवा महोत्सवाचे आयोजन यंदा बार्शी येथील श्री शिवाजी महावि
Univerisity Solapur


श्री शिवाजी महाविद्यालयात आयोजन; दोन हजारांहून अधिक विद्यार्थी-कलाकारांचा सहभाग अपेक्षित

सोलापूर, ४ ऑगस्ट (हिं.स.) :पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बहुप्रतिक्षित २२ व्या युवा महोत्सवाचे आयोजन यंदा बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालयात होणार आहे. तब्बल १४ वर्षांनंतर ‘भगवंत नगरी’ला या प्रतिष्ठेच्या महोत्सवाचे यजमानपद मिळाले असून, सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कला क्षेत्रातील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणारा युवा महोत्सव विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देतो. यंदाचा महोत्सव सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता असून, अधिकृत तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.

यजमानपदासाठी विविध महाविद्यालयांमध्ये चर्चा सुरू असताना श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी यांनी पुढाकार घेत महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली. यापूर्वी २०१२ मध्ये याच महाविद्यालयाने युवा महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले होते. यंदा पुन्हा संधी मिळाल्याने महाविद्यालय प्रशासनाकडून तयारीला वेग देण्यात आला आहे.

विद्यापीठाशी संलग्न ११७ महाविद्यालयांतील दोन हजारांहून अधिक विद्यार्थी-कलाकार या महोत्सवात सहभागी होण्याची शक्यता आहे. नृत्य, संगीत, नाट्य, साहित्य, ललितकला, लोककला यांसह विविध कलाप्रकारांमधील स्पर्धांमध्ये विद्यार्थी आपले कौशल्य सादर करणार आहेत.

विशेष म्हणजे, आतापर्यंत झालेल्या २१ युवा महोत्सवांपैकी १६ वेळा सर्वसाधारण विजेतेपद (जनरल चॅम्पियनशिप) पटकावण्याचा मान श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शीला मिळाला आहे. तसेच महाविद्यालयाने चार वेळा उपविजेतेपदही मिळविले आहे.

घरच्या मैदानावर होणाऱ्या यंदाच्या युवा महोत्सवात बार्शीच्या विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात असून, महोत्सवाच्या आयोजनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande