
आरक्षण हटाव’ मोहिमेवर प्रतिक्रिया देताना शिक्षणाच्या संधींवर दिला भर
छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट (हिं.स.) : सोशल मीडियावर सुरू असलेल्या ‘आरक्षण हटाव’ मोहिमेवर प्रतिक्रिया देताना कॉक्रोज जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी शिक्षण सर्वसामान्य आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला आहे.
देशातील गरीब आणि वंचित घटकांना जास्तीत जास्त शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. आरक्षण म्हणजे गाडी-बंगला देणे नाही, तर शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे साधन आहे. ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलेले नाही, त्या मुलांपर्यंत शिक्षण कसे पोहोचेल, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. शिक्षण सर्वांसाठी सुलभ झाले, तरच देश खऱ्या अर्थाने प्रगती करेल,” असे अभिजीत दिपके यांनी सांगितले.
दरम्यान, सोशल मीडियावर सुरू असलेल्या या मोहिमेबाबत अधिक भाष्य करण्यास दिपके यांनी टाळले. “त्या आंदोलनाबाबत मी अधिक बोलणार नाही. संबंधित पेज काल डिलीट झाल्याचे मला सांगण्यात आले आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षणाच्या समान संधी आणि वंचित घटकांच्या प्रगतीवर भर देत दिपके यांनी आरक्षणाच्या चर्चेपेक्षा शिक्षणव्यवस्थेच्या विस्ताराची गरज अधोरेखित केली.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis