
लातूर, 04 ऑगस्ट, (हिं.स.)। किल्लारी ग्रामसभा नियोजित वेळेत न घेतल्याप्रकरणी किल्लारी ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 7(1) चे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्याने हा निर्णय देण्यात आला.
या प्रकरणात ग्रामसभा वेळेत न घेण्याची जबाबदारी ग्रामविकास अधिकाऱ्यांची असल्याचा युक्तिवाद सरपंचांकडून करण्यात आला होता. मात्र, ग्रामसभा घेण्याची अंतिम जबाबदारी ही सरपंचांचीच असल्याचे स्पष्ट करत जिल्हाधिकाऱ्यांनी हा युक्तिवाद फेटाळून लावला.
तक्रारदारांनी दाखल केलेल्या अर्जावरील सुनावणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामसभा वेळेत न घेतल्याचा आरोप सिद्ध झाल्याचे नमूद केले. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार सरपंचांना अपात्र घोषित करण्यात आले असून त्यांचे पद तत्काळ रिक्त घोषित करण्यात आले आहे. तसेच, अपात्रतेसाठी दाखल करण्यात आलेला अर्ज मंजूर करण्यात आला.
या निर्णयामुळे किल्लारी ग्रामपंचायतीच्या राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींना वेग आला असून, पुढील सरपंच निवडीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis