
लातूर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। शेतकरी कामगार पक्ष हा सत्यशोधक आणि मार्क्सवादी विचारसरणीचा कडवा पुरस्कर्ता असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावत आला आहे, असे प्रतिपादन प्रा. रमेश पारवे यांनी केले. शेतकरी कामगार पक्षाच्या ७९ व्या वर्धापनदिनानिमित्त लातूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात ॲड. सुरेश शिंदे यांची शेतकरी कामगार पक्षाच्या किसान आघाडीच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडीनंतर बोलताना त्यांनी जिल्ह्यातील पुरोगामी विचारांच्या पक्ष व संघटनांना एकत्र आणून शासनाच्या हुकूमशाही धोरणांविरोधात जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लाल झेंड्याला ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर प्रा. रमेश पारवे यांनी पक्षाच्या वैचारिक परंपरेचा आढावा घेत शेतकरी, कामगार आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी शेतकरी कामगार पक्षाने सातत्याने संघर्ष केल्याचे सांगितले. आजही पक्ष आपल्या मूळ विचारांशी प्रामाणिक राहून सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांसाठी कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी भाई उदय गवारे, राजेंद्र विहीरे, ॲड. सुरेश शिंदे आणि भाई एकनाथराव कवठेकर यांनीही मनोगत व्यक्त करत पक्षाची वाटचाल, संघटनात्मक बळकटी आणि आगामी कार्ययोजना याविषयी विचार मांडले. या कार्यक्रमास भाई उदय गवारे, ॲड. सुशील सोमवंशी, राजेंद्र विहीरे, एकनाथराव कवठेकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis