राज्यभर परिचारिकांचे दोन तास कामबंद आंदोलन; प्रलंबित मागण्यांसाठी सरकारविरोधात तीव्र निदर्शने
अकोला, 04 ऑगस्ट (हिं.स.)। सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिका संवर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज, ४ ऑगस्ट रोजी राज्यभर दोन तासांचे कामबंद आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या नेतृत्वाखाली
राज्यभर परिचारिकांचे दोन तास कामबंद आंदोलन; प्रलंबित मागण्यांसाठी सरकारविरोधात तीव्र निदर्शने


अकोला, 04 ऑगस्ट (हिं.स.)। सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिका संवर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज, ४ ऑगस्ट रोजी राज्यभर दोन तासांचे कामबंद आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या नेतृत्वाखाली सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत जिल्हास्तरावर तीव्र निदर्शने करण्यात आली. सुधारित सेवा प्रवेश नियम, पदोन्नती प्रक्रिया, सुधारित आकृतिबंध आणि रिक्त पदांची भरती तात्काळ पूर्ण करावी, अशी परिचारिकांची प्रमुख मागणी आहे.

महाराष्ट्र शासनाने सेवाविषयक बाबी निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी १५० दिवसांचा विशेष कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमांतर्गत सेवा प्रवेश नियम, पदोन्नती, आकृतिबंध आणि रिक्त पदांची भरती पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, मुदत संपूनही परिचारिका संवर्गाशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप फेडरेशनने केला आहे.

सुधारित सेवा प्रवेश नियम अंतिम न झाल्यामुळे हजारो परिचारिका पदोन्नतीपासून वंचित असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच सुधारित आकृतिबंधास मंजुरी न मिळाल्याने नवीन पदनिर्मिती आणि भरती प्रक्रिया रखडली असून विद्यमान परिचारिकांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत आहे. याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

फेडरेशनच्या म्हणण्यानुसार, शासनाकडे अनेक वेळा निवेदने देऊन, बैठका घेऊन आणि सातत्याने पाठपुरावा करूनही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यभरातील परिचारिका संवर्गामध्ये तीव्र नाराजी असून अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आंदोलनादरम्यान सुधारित सेवा प्रवेश नियम तात्काळ अंतिम करणे, सुधारित आकृतिबंधास शासन मान्यता देणे, सर्व प्रलंबित पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करणे, रिक्त पदांवरील सरळ सेवा भरती सुरू करणे आणि परिचारिका संवर्गाच्या सर्व प्रलंबित सेवाविषयक प्रश्नांवर कालबद्ध निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

फेडरेशनने राज्यातील सर्व परिचारिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले असून, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.

राज्यभर सुरू झालेल्या या आंदोलनामुळे परिचारिका संवर्गाच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासन कितपत गांभीर्याने पाहते आणि त्यांच्या मागण्यांवर लवकर निर्णय घेते का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande