
अकोला, 04 ऑगस्ट, (हिं.स.)। आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक जीवनात ताणतणाव असला तरी तरी प्रसन्न मन, सकारात्मक विचारसरणी आणि योग्य दृष्टिकोनाच्या बळावर त्यावर सहज मात करता येते. मनातील भीती, आणि न्यूनगंड झुगारून आत्मविश्वासाने निर्णय घेण्याची वृत्ती विकसित केल्यास व्यक्तिमत्त्व अधिक सक्षम बनते, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज)चे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी केले. ते महाबीज मुख्यालयात ‘ताण-तणावमुक्ती’ विषयावरील संवाद व समुपदेशन कार्यशाळेत बोलत होते.
यावेळी महाव्यवस्थापक (प्रशासन) डॉ. संजय गरकल,महाव्यवस्थापक (विपणन) व्ही.आर.देशमुख,महाव्यवस्थापक (प्रक्रिया)पी. जी. पागृत,महाव्यवस्थापक (उत्पादन)व्ही. व्ही. ठाकरे, प्रफुल्ल लहाने महाव्यवस्थापक गुणी,श्री.यादव महा व्यवस्थापक वित्त यांच्यासह महाबीज मुख्यालयातील विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
व्यवस्थापकीय संचालक स्वामी म्हणाले की,बदलत्या कामकाजाच्या पद्धतीत मानसिक आरोग्य जपणे ही प्रत्येक कर्मचाऱ्याची गरज असून, सकारात्मक ऊर्जा आणि सहकार्याची भावना कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
तणावमुक्त जीवनासाठी सकारात्मक दृष्टीकोन, वेळेचे प्रभावी व्यवस्थापन, नियमित योगाभ्यास, प्रेरणादायी साहित्याचे वाचन, परिस्थितीनुसार तडजोड करण्याची तयारी, समस्यांवर पर्याय शोधण्याची वृत्ती आणि सहकार्याची भावना बाबी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
कार्यशाळेत महाबीजचे ५०० हून अधिक अधिकारी व कर्मचारी दूरदृश्य प्रणालीद्वारे तर मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे