
अकोला, 04 ऑगस्ट (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे प्रदेश संघटक सचिव जावेद जकरिया यांनी राज्यातील राजकारणात अलीकडे एकमेकांविरोधात वापरल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह व अशोभनीय भाषेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
ते म्हणाले की, राजकीय मतभेद हे लोकशाहीचा अविभाज्य भाग आहेत. मात्र, कोणत्याही नेत्याने दुसऱ्या नेत्याविषयी गूंगी गुड़िया अशा वैयक्तिक व अपमानास्पद शब्दांचा वापर करणे योग्य नाही. अशा प्रकारची भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला आणि लोकशाही मूल्यांना शोभणारी नाही.
जावेद जकरिया म्हणाले की, महिला असो किंवा पुरुष, कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या सन्मानाला धक्का पोहोचेल अशा शब्दांचा वापर टाळला पाहिजे. राजकीय विरोध हा मुद्दे, धोरणे आणि जनहिताच्या प्रश्नांवर असावा; वैयक्तिक टीका किंवा अपमानास्पद भाषेवर नव्हे.
सर्व राजकीय पक्षांनी संयम, सभ्यता आणि राजकीय मर्यादा पाळाव्यात, असे आवाहन करत त्यांनी सांगितले की, जनतेला आपल्या नेत्यांकडून सकारात्मक राजकारण, विकासाचे प्रश्न आणि लोकहिताच्या विषयांवर चर्चा अपेक्षित आहे. अशोभनीय भाषा समाजात चुकीचा संदेश देते आणि राजकीय वातावरण दूषित करते.
जावेद जकरिया यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्राच्या राजकारणात सभ्य संवादाची समृद्ध परंपरा आहे. सर्व नेत्यांनी या परंपरेचा आदर राखत शालीन व सुसंस्कृत भाषेचा वापर करावा, जेणेकरून लोकशाहीची प्रतिष्ठा आणि समाजातील परस्पर सन्मान कायम राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे