
अकोला, 04 ऑगस्ट, (हिं.स.)। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध 'मन की बात' कार्यक्रमांमधून पर्यावरण संरक्षण, जलस्रोतांचे संवर्धन, लोकसहभागातून स्वच्छता, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन आणि पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचे सातत्याने आवाहन केले आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) मूर्तींऐवजी शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा वापर, घरगुती विसर्जन, जलप्रदूषण टाळणे, स्थानिक मूर्तिकारांना प्रोत्साहन आणि पर्यावरणाशी सुसंगत उत्सव साजरा करण्यावर भर दिला. त्याचबरोबर एक पेड माँ के नाम अभियानाद्वारे वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देशभर पोहोचविला.
या राष्ट्रीय संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी अकोला महानगरपालिकेने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) अंतर्गत उपलब्ध Information, Education and Communication (IEC) निधीतून ३० लाख रुपयांची विशेष आर्थिक तरतूद करून २५ हजार विद्यार्थ्यांसाठी चार भव्य-दिव्य पर्यावरणपूरक शाडू माती श्री गणेशमूर्ती निर्मिती, घरगुती विसर्जन व तुळस वृक्षारोपण अभियान राबवावे, अशी मागणी गटनेता तथा नगरसेवक निलेश रामकृष्ण देव यांनी महापौर सौ. शारदाताई रणजीतभाऊ खेडकर आणि आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्याकडे सादर केलेल्या सविस्तर निवेदनातून केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचा उद्देश केवळ वायू प्रदूषण कमी करणे एवढाच नसून नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैली विकसित करणे, जनजागृती वाढविणे आणि लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाला चालना देणे हा आहे. त्यामुळे IEC निधीचा वापर फलक, जाहिराती किंवा औपचारिक कार्यक्रमांपुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या उपक्रमांसाठी करण्यात यावा.
गेल्या वर्षी अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या १० हजार विद्यार्थ्यांच्या पर्यावरणपूरक शाडू माती गणेशमूर्ती कार्यशाळेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. या कार्यशाळेत हजारो विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश समाजात पोहोचविला. या उपक्रमास तत्कालीन जिल्हाधिकारी, विद्यमान आयुक्त डॉ. सुनील लहाने, विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक, पालक आणि सामाजिक संस्थांनीही सक्रिय सहकार्य केले होते.
याच यशस्वी उपक्रमाचा विस्तार करत यावर्षी अकोला महानगरपालिका क्षेत्रातील चारही झोनमध्ये प्रत्येकी एक अशा चार भव्य कार्यशाळा आयोजित करून एकूण २५ हजार विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. शहरातील सर्व शासकीय, अनुदानित, खासगी तसेच सर्व माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना या अभियानात सहभागी करून प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या हाताने शाडू मातीची गणेशमूर्ती तयार करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी.
या अभियानाची संकल्पना आपला बाप्पा... आपल्या घरीच विसर्जन करा आणि ऑक्सिजन निर्माण करा अशी आहे. विद्यार्थी स्वतः तयार केलेली शाडू मातीची गणेशमूर्ती घरी प्रतिष्ठापित करतील. गणेशोत्सवानंतर नदी, नाले किंवा तलावात विसर्जन करण्याऐवजी घरातील कुंडी किंवा मातीच्या भांड्यातच विसर्जन करतील. विसर्जनानंतर त्या शाडू मातीमध्ये तुळशीचे रोप लावण्यात येईल. त्यामुळे जलप्रदूषण टळेल, घराघरांत हरित वातावरण निर्माण होईल आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला जाईल.
या अभियानामुळे POP मूर्तींचा वापर कमी होईल, नदी-नाले व तलावांचे प्रदूषण रोखले जाईल, हजारो घरांमध्ये तुळशीची लागवड होईल, हरित वातावरण निर्माण होईल, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीची सवय रुजेल, स्थानिक मूर्तिकारांना प्रोत्साहन मिळेल आणि राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाची उद्दिष्टे प्रभावीपणे साध्य होतील.
प्रस्तावानुसार ३० लाखांच्या IEC निधीतून शाडू माती, प्रशिक्षण साहित्य, तज्ज्ञ मूर्तिकारांचे मार्गदर्शन, पर्यावरणतज्ज्ञांचे व्याख्यान, तुळशीची रोपे, घरगुती विसर्जन मार्गदर्शिका, जनजागृती साहित्य, स्वयंसेवक व्यवस्था, ध्वनी-चित्रफीत, प्रचार-प्रसिद्धी आणि चारही कार्यशाळांचे संपूर्ण आयोजन करण्यात यावे. प्रत्येक विद्यार्थ्याला पर्यावरण संरक्षणाची शपथ देण्यात यावी आणि एक विद्यार्थी – एक तुळस हा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्यात यावा.
निलेश रामकृष्ण देव यांनी निवेदनात म्हटले आहे की, अकोला महानगरपालिकेने हा उपक्रम हाती घेतल्यास तो केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित राहणार नाही, तर स्वच्छ हवा, स्वच्छ जलस्रोत, हरित पर्यावरण, लोकसहभाग आणि पर्यावरण शिक्षण या पाचही उद्दिष्टांची एकत्रित पूर्तता करणारा राज्यातील आदर्श प्रकल्प ठरेल. अकोला शहर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे मॉडेल म्हणून महाराष्ट्रासमोर उभे राहू शकते.
त्यामुळे राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) अंतर्गत उपलब्ध IEC निधीतून ३० लाख रुपयांची तातडीने प्रशासकीय मंजुरी देऊन गणेशोत्सवापूर्वी चारही भव्य शाडू माती कार्यशाळा आयोजित करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी महापौर सौ. शारदाताई रणजीतभाऊ खेडकर व आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्याकडे केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे