
अमरावती, 04 ऑगस्ट (हिं.स.) | नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पहूर येथील रहिवासी तुळशीदास बन्सीराव जेठे यांनी फायनान्स कंपनीविरोधात अन्यायकारक वसुली, मानसिक त्रास आणि घर जप्तीची धमकी दिल्याचा आरोप करीत जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, जेठे यांनी एका फायनान्स कंपनीकडून एक लाख ३० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. विमा व इतर कपातीनंतर त्यांना एक लाख १५ हजार रुपये धनादेशाद्वारे मिळाले. संबंधित कर्जाची संपूर्ण परतफेड केल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, कंपनीच्या एजंटच्या निष्काळजीपणामुळे किंवा आर्थिक गैरव्यवहारामुळे त्यांच्या खात्यात अद्याप थकबाकी दाखविण्यात येत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. याबाबत अनेक वेळा कंपनीशी संपर्क साधूनही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप करीत, उलट पुन्हा पैशांची मागणी करण्यात येत आहे. पैसे न भरल्यास घर जप्त करण्याची धमकी दिली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे स्वतःला मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
याप्रकरणाची सखोल चौकशी करून फायनान्स कंपनी व संबंधित एजंटच्या व्यवहाराची तपासणी करण्यात यावी, भरलेल्या कर्जाची नोंद पडताळून चुकीची थकबाकी तत्काळ रद्द करावी, तसेच घर जप्तीच्या धमक्या व अन्यायकारक वसुली त्वरित थांबवावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून न्याय मिळवून द्यावा, अशीही विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी