
अमरावती, 04 ऑगस्ट (हिं.स.)।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गतिमान शासन व पारदर्शक प्रशासनाच्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेच्या कामकाजाची सखोल समीक्षा करण्यासाठी राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे आणि विधानपरिषद आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या पुढाकाराने शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता मनपा आयुक्त दालनात मॅरेथॉन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत महापौर श्रीचंद तेजवानी, मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदवले, वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.अमरावती व बडनेरा परिसरातील नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकरण, प्रलंबित विकासकामांचा आढावा, मनपाचे उत्पन्न वाढवून आर्थिक सक्षमता निर्माण करणे तसेच शहरातील विविध नागरी समस्यांवर ठोस निर्णय घेण्यावर बैठकीत भर दिला जाणार आहे.
शहरातील स्वच्छता व्यवस्था, उघड्यावर होणारी मांसविक्री रोखणे, हॉकर्स झोन निश्चित करून नोंदणी प्रक्रिया, पादचारी फुटपाथ अतिक्रमणमुक्त करणे, वाहतूक शिस्तबद्ध करण्यासाठी ट्रॅफिक सिग्नलच्या कालावधीत आवश्यक बदल, खाजगी रुग्णालयांतील मेडिकल वेस्टची विल्हेवाट, हॉटेल्स व लॉन्समधील उरलेल्या अन्नाची योग्य विल्हेवाट, प्रत्येक प्रभागातील कचरा संकलन व्यवस्था, वृक्षतोडीवर नियंत्रण, मनपाच्या मालकीच्या मोकळ्या जागा व सार्वजनिक मैदानांची स्वच्छता, पावसाळ्यात साथीचे आजार रोखण्यासाठी उपाययोजना, उद्यानांची देखभाल, अतिक्रमण विभागाचे कामकाज, शहर सौंदर्यीकरण, देशी वृक्ष लागवड, मनपाचे मनुष्यबळ, कंत्राटी व्यवस्था तसेच मंजूर व रखडलेल्या विकासकामांची गुणवत्ता आणि खर्च यांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.
आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी सांगितले की, ही बैठक केवळ औपचारिकता नसून शहराच्या विकासासाठी निर्णायक ठरेल. नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, प्रशासकीय अडथळे दूर करणे, अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय वाढविणे तसेच राज्य शासनाकडून अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी आवश्यक विषयांचे संकलन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रभावी पाठपुरावा केला जाणार आहे.जनहिताच्या प्रत्येक मुद्द्यावर सखोल चर्चा करून अमरावतीच्या रखडलेल्या विकासाला गती देण्यासाठी ठोस निर्णय घेतले जातील, असा विश्वासही प्रवीण पोटे पाटील यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी