
अमरावती, ४ ऑगस्ट (हिं.स.) : मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत अमरावती जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली असून, जिल्ह्यातील काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. जिल्ह्यातील एकूण २५ लाख ४५ हजार ६७७ मतदारांपैकी २१ लाख ३७ हजार १७२ मतदारांचे अर्ज म्हणजेच ८३.९५ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. तर एसआयआर मोहिमेचे एकूण ९५.५३ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील २ लाख ९४ हजार ५९१ मतदार ‘असंग्रहित’ (अनकलेक्टेबल) आढळून आले आहेत. त्यामुळे या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
बीएलओंनी केलेल्या गृहभेटीदरम्यान मतदार याद्यांमधील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. यामध्ये १ लाख ३६ हजार ५०८ मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याचे आढळले. तसेच १ लाख ३ हजार ४०२ मृत मतदारांची नावे अद्याप यादीत कायम होती. याशिवाय ४२ हजार २१७ मतदारांची दुबार नोंदणी, ११ हजार ५३१ मतदार अनुपस्थित आणि ९३३ इतर प्रकरणे निदर्शनास आली आहेत.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी दर्यापूर मतदारसंघात एसआयआरचे सर्वाधिक ९९.१२ टक्के काम पूर्ण झाले असून, हा मतदारसंघ प्रथम क्रमांकावर आहे. तर अमरावती शहर मतदारसंघात ९०.४३ टक्के काम पूर्ण झाले असून ते तुलनेने कमी आहे.
मतदारसंघनिहाय कामगिरी पाहता मोर्शी मतदारसंघात ९०.१० टक्के डिजिटायझेशन आणि ९७.९७ टक्के एकूण काम पूर्ण झाले आहे. अचलपूरमध्ये ९६.८७ टक्के, तिवसा ९६.२७ टक्के, मेळघाट ९४.९९ टक्के, बडनेरा ९२.४३ टक्के, धामणगाव रेल्वे ९२.१९ टक्के आणि अमरावती शहर मतदारसंघात ९०.४३ टक्के काम पूर्ण झाले आहे.
निवडणूक विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी ८ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये मृत, कायमस्वरूपी स्थलांतरित, दुबार नोंदणी झालेल्या तसेच इतर अपात्र मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्या मतदारांनी अद्याप गणना अर्ज भरलेला नाही त्यांनी तातडीने आपल्या बीएलओकडे अर्ज जमा करावा. अन्यथा संबंधितांचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ शकते. पात्र मतदारांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी