नवीन कोकण एक्सप्रेसला मंजुरी; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा शिवसेनेकडून सत्कार
डोंबिवली, 04 ऑगस्ट (हिं.स.)छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोडदरम्यान नवीन नियमित एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यास मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा नवी दिल्ली येथे शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्या
Ph01


डोंबिवली, 04 ऑगस्ट (हिं.स.)छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोडदरम्यान नवीन नियमित एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यास मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा नवी दिल्ली येथे शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने व कोकणवासीयांच्या वतीने हा सत्कार करण्यात आला.

मुंबई-कोकण दरम्यान वाढती प्रवासी संख्या, विशेषतः गणेशोत्सवासह सणासुदीच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन नवीन नियमित एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे केला होता. त्याला यश मिळाल्यानंतर रेल्वेमंत्री वैष्णव यांचे आभार मानण्यासाठी हा सत्कार आयोजित करण्यात आला.

मुंबई आणि कोकणदरम्यान नियमित रेल्वे सेवा उपलब्ध व्हावी, ही कोकणवासीयांची दीर्घकाळापासूनची मागणी होती. नवीन एक्सप्रेसमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी भावना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली.

या एक्सप्रेसला सीएसएमटी, दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे थांबे प्रस्तावित आहेत. या सेवेमुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसह विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांना मोठी सुविधा मिळणार असून कोकणातील पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर तसेच खासदार नरेश म्हस्के, संजय दिना पाटील, श्रीरंग बारणे, ओम राजे निंबाळकर आदी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande