रत्नागिरी : अभिनेत्री अर्चना पेनकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे
रत्नागिरी, 4 ऑगस्ट (हिं.स.) । वेरवली बुद्रुक (ता. लांजा) येथील वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचालित श्रीराम विद्यालय व तुकाराम पुंडलिक शेटे कनिष्ठ महाविद्यालयात पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष नाट्य प्रशिक्षण शिबिर पार पडले. विद्यार्थ्
श्रीराम विद्यालयात अभिनेत्री अर्चना पेनकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे


रत्नागिरी, 4 ऑगस्ट (हिं.स.) । वेरवली बुद्रुक (ता. लांजा) येथील वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचालित श्रीराम विद्यालय व तुकाराम पुंडलिक शेटे कनिष्ठ महाविद्यालयात पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष नाट्य प्रशिक्षण शिबिर पार पडले.

विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, अभिनयाची आवड जोपासली जावी तसेच त्यांच्यात आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि सादरीकरणाची क्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेत्री सौ. अर्चना पेनकर यांनी विद्यार्थ्यांना नाट्यकलेची मूलभूत तत्त्वे अतिशय सोप्या, रंजक आणि प्रात्यक्षिकांद्वारे समजावून सांगितली. अभिनय ही केवळ कला नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना रंगमंचावरील आत्मविश्वासाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनाही विविध प्रसंग, संवाद आणि लघुनाटिकांमधून अभिनय करण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत अभिनयाचे विविध पैलू अनुभवले.

शिबिरात सभाधीटपणा, संवादकौशल्य, व्हॉइस मॉड्युलेशन, स्पष्ट उच्चार, शरीरबोली, चेहऱ्यावरील हावभाव आणि पात्रानुसार अभिनयातील बदल या महत्त्वाच्या विषयांवर विशेष भर देण्यात आला. रंगमंचावर भीती न बाळगता आत्मविश्वासाने कसे उभे राहावे, संवाद प्रभावीपणे कसा सादर करावा, तसेच शरीरबोलीच्या माध्यमातून पात्र अधिक जिवंत कसे करावे, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रसंग सादर करून आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवली.

विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन केल्याबद्दल संस्थेचे सचिव संतोष पडवणकर यांच्या हस्ते सौ. अर्चना पेनकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande