
नाशिक, 04 ऑगस्ट (हिं.स.)। : चार दिवसांपासून सुरू असलेल्या अथक शोधमोहिमेनंतर अखेर वालदेवी नदीच्या पुरात वाहून गेलेल्या अभिषेक अनिल जाधव याचा मृतदेह मंगळवारी (दि.४) सापडला. पुलाजवळील बंधाऱ्यालगत झाडाझुडपांमध्ये मंगळवारी सकाळी अभिषेकचा मृतदेह आढळून आला. एकुलता एक मुलगा गमावल्याने आई शुभांगी जाधव यांचा घटनास्थळी झालेला आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
नाशिकच्या दाढेगावजवळील वालदेवी नदीवरील पुलावरून २८ वर्षीय अभिषेक जाधव हा १ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात दुचाकीसह वाहून गेला होता. घटनेनंतर अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांकडून सलग चार दिवस त्याचा शोध घेतला जात होता. मात्र, शोधमोहीम राबवूनही अभिषेकचा ठावठिकाणा लागत नव्हता.
मंगळवारी सकाळी पुलाजवळील बंधाऱ्याकडे काही कुत्रे वारंवार जात असल्याचे दोन महिलांच्या लक्षात आले. संशय आल्याने त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता झाडाझुडपांमध्ये रेनकोट घातलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीने गावकऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर संजय सोनवणे यांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढला. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनीही मदत केली. मृतदेहाजवळ सापडलेल्या ओळखपत्रावरून मृतदेह अभिषेक जाधव याचा असल्याची खात्री झाली.
चौकट
आईचा आधार हिरावला; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अभिषेक जाधव हा नाशिक रोड येथील जय भवानी रोड परिसरात राहत होता. त्याचे वडील यापूर्वीच मयत झाले असून तो आई शुभांगी जाधव यांच्यासोबत राहत होता. त्याला एक बहीण असून तिचे लग्न झाले आहे. अभिषेक एबीपी कंपनीत कार्यरत होता. ड्युटी संपल्यानंतर घरी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. एकुलता एक मुलगा अचानक हिरावल्याने आई शुभांगी जाधव यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनास्थळी त्यांनी केलेला हंबरडा उपस्थितांना हेलावून टाकणारा होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV