
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या सहकार्याने नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण
चंद्रपूर, 04 ऑगस्ट (हिं.स.) : आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झालेल्या अकोला येथील प्रशांत इंगळे (वय 47) यांना शासकीय मदत आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे नवजीवन मिळाले आहे. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले.
प्रशांत इंगळे यांच्या उपचारासाठी सुमारे 25 ते 30 लाख रुपयांची आवश्यकता होती. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 2 लाख रुपये आणि टाटा ट्रस्टकडून 19 लाख 60 हजार रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध झाल्याने एकूण 21 लाख 60 हजार रुपयांचा निधी उभारण्यात आला. या मदतीमुळे अत्यंत खर्चिक असलेली यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शक्य झाली.
या शस्त्रक्रियेत प्रशांत इंगळे यांच्या पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करून पतीला जीवनदान दिले.
प्रशांत इंगळे हे अकोला येथे केबल टाकण्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कुटुंबात वृद्ध आई-वडील, पत्नी, महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मुलगी आणि दहावीत शिकणारा मुलगा आहे.
सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 दरम्यान प्रशांत इंगळे यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. अकोला आणि नागपूर येथे झालेल्या वैद्यकीय तपासण्यांनंतर त्यांचे यकृत गंभीररीत्या निकामी होत असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी तातडीने यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला; मात्र उपचाराचा मोठा खर्च कुटुंबाच्या आर्थिक क्षमतेबाहेर होता.
या कठीण परिस्थितीत पत्नी वर्षा इंगळे यांनी कुटुंबीयांसह अकोल्याच्या आमदारांची भेट घेतली.
त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत माहिती देत मुंबई येथे उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर इंगळे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांची भेट घेतली.
रामेश्वर नाईक यांनी प्रकरणाची तातडीने दखल घेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी तसेच टाटा ट्रस्टकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
या आर्थिक सहाय्यामुळे 25 जून 2026 रोजी मुंबईतील नानावटी रुग्णालयात प्रशांत इंगळे यांच्यावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाल्याने 13 जुलै 2026 रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते हळूहळू पूर्णपणे बरे होत आहेत.
वेळेवर मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे आपल्याला नवजीवन मिळाल्याची भावना व्यक्त करत इंगळे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक तसेच टाटा ट्रस्टचे मनःपूर्वक आभार मानले.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव